ZP Students NASA US Tour Pudhari
पुणे

ZP Students NASA US Tour: ‘पुणे मॉडेल स्कूल’ प्रकल्पांतर्गत २५ विद्यार्थी १० दिवसांच्या अमेरिकन दौऱ्यावर

नासा-इस्रोसाठी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रपती भवन दौरा; दिल्लीत १४ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक भेटींचा कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इस्रोच्या भेटीनंतर आता 10 दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी 25 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, ते वॉशिंग्टन, ऑरलॅंडो आणि सॅन फ्रान्सिस्को या तीन शहरांना भेट देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शाळांतील हे २५ विद्यार्थी शुक्रवारी (ता. १४) मुंबईहून अमेरिकेच्या दौर्‍यासाठी रवाना होणार आहेत. यापूर्वी ५० विद्यार्थ्यांनी इस्रोचा दौरा पूर्ण केला आहे. नासा आणि इस्रोसाठी निवड न झालेल्या ५० विद्यार्थी व १० शिक्षकांसाठी दिल्लीतील राष्ट्रपती भवनासह इतर शैक्षणिक ठिकाणांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

'पुणे मॉडेल स्कूल' प्रकल्पांतर्गत आयोजित या शैक्षणिक दौर्‍यात विद्यार्थी वॉशिंग्टन डी.सी. येथे तीन दिवस राहणार आहेत. ते नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर, तसेच नासा मुख्यालयाला भेट देणार आहेत. भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांची भारतीय दूतावासात भेट घेणार आहेत. त्यानंतर ऑरलॅंडो येथील नासा, केनेडी स्पेस सेंटरला भेट देऊन तेथील शास्त्रज्ञांशी संवाद साधणार आहेत.

या शिवाय सॅन फ्रान्सिस्को येथे विद्यार्थी कॅलिफोर्निया अॅकॅडमी ऑफ सायन्सेस तसेच विविध अग्रगण्य तंत्रज्ञान कंपन्यांना भेट देणार आहेत. सॅन फ्रान्सिस्को दौऱ्याचे समन्वय महाराष्ट्र मंडळ बे एरिया आणि ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनच्या माध्यमातून होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, दिल्लीलाही १४ नोव्हेंबर रोजी पन्नास विद्यार्थी जाणार असून, त्यांना राष्ट्रपतींशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर नेहरू तारामंडळ, नॅशनल सायन्स सेंटर, जंतर मंतर आदी ठिकाणी भेट देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

आयुकातील २ शास्त्रज्ञांसह विद्यार्थी अमेरिकेकडे उद्या होणार रवाना!

या दौऱ्यासाठी आयुका (अंतर्विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र) तर्फे जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता ६ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्‍यातून निवडण्यात आलेले २५ विद्यार्थी शुक्रवारी (ता. १४) मुंबईहून अमेरिकेच्या दौर्‍यासाठी रवाना होणार आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यावेळी आयुका येथील दोन शास्त्रज्ञदेखील विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT