

कोंढवा: कोयते नाचवत दहशत माजविणारे, गाड्यांची तोडफोड, गाड्या पेटवून देणे, बेभान दुचाकी चालविणार्या गुन्हेगारांच्या काळेपडळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून कुख्यात गुंडांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला आहे. नवख्या गुन्हेगारांवर वेळीच जरब बसवली आहे.
काळेपडळ पोलिस ठाणे हे काही महिन्यांपूर्वी सुरू झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना या पोलिस ठाण्याकडून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील हे राबवत आहेत. मंगळवारी सायंकाळी श्रीराम चौकात गुन्हेगारांची धिंड काढली व सर्वसामान्य नागरिकांसोबत आम्ही आहोत, हे पोलिसांनी जनतेला दाखवून दिले.
काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानुसार विधिसंघर्षित बालकांना पोलिस स्टेशनमध्ये समक्ष बोलावून योग्य सूचना देण्यात आल्या. त्यांच्या सविस्तर माहितीचे अर्ज (डोझियर) भरण्यात आले.
तसेच, त्यांचे नातेवाईक, पालकांना देखील सदरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विधिसंघर्षित बालकांकडून झालेले गुन्हे पुन्हा घडणार नाहीत, याबाबत पालकांनी ग्वाही दिली. विधिसंघर्षित बालकांवर योग्य ती प्रतिबंधक कार्यवाही करण्याची तजवीज सुरू आहे.
तसेच, सदर विधिसंघर्षित बालकांना समुपदेशनद्वारे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. विधिसंघर्षित बालकांचे नातेवाईक व पालक यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले.