

आबाजी पोखरकर
पिंपरखेड : राज्य शासनाने काही बिबटे ‘वनतारा’ (गुजरात) येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्रास पाठविण्याची तयारी दाखविली आहे. स्थलांतर ही तात्पुरती आणि प्रभावी पद्धत असू शकते; परंतु बिबट्यांची मोठी संख्या आणि अनुकूल अधिवास यामुळे हे केवळ अपुरे पाऊल ठरू शकते. जिथे प्रजनन दर जास्त असेल तिथे स्थलांतराने कायमस्वरूपी नियंत्रण शक्य आहे, असे सांगता येत नाही.(Latest Pune News)
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात वन विभागाला एका महिन्यात 11 बिबटे जेरबंद करण्यास यश मिळाले आहे; परंतु वाढत्या संख्येमुळे आणि मर्यादित साधनसामग््राीमुळे हा दर टिकाव धरू शकेल की नाही, हे अनिश्चित आहे. पिंपरखेड परिसरात बिबट्यांचा प्रश्न आता केवळ वन विभागाचा राहीला नाही, तर समाज-राजकीय, शेती आणि पर्यावरणीय धोरणांचा प्रश्न बनला आहे. तातडीने स्थलांतर, पिंजरेबांधणी आणि तांत्रिक मदत आवश्यक असली तरीही, कायमस्वरूपी ‘बिबटमुक्त’ परिसर मोहीम यशस्वी होण्यासाठी संख्या नियंत्रण, शाश्वत धोरणे व स्थानिक सहभाग या तिन्ही गोष्टी एकत्र येणे गरजेचे आहे.
दीर्घकालीन व बहुमुखी उपाय
यंत्रणात्मक मजबुती : अधिक पिंजरे, प्रशिक्षित रेस्क्यू टीम व तांत्रिक साधने
(ड्रोन, नाईट-विजन कॅमेरे, एआय ट्रॅकिंग) तातडीने उपलब्ध करणे आवश्यक आहे. संख्यानुरूप व्यवस्थापन : गर्भनिरोधक उपाय, नियंत्रित स्थलांतर व सुयोग्य राखीव मंडळांमध्ये बिबट्या कॅम्प तयार करणे. हे दीर्घकालीन दृष्टीकोनात उपयुक्त ठरू शकते.
स्थानिक सहभाग : शेतकऱ्यांना जागरूक करणे, ऊस शिवाराचे व्यवस्थापन व मानव वस्तीपासून शेतजमीन वेगळी ठेवण्याचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
कायदा व धोरणातील बदल : स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर संशोधन-आधारित नियमावली तयार केली पाहिजे ज्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी स्पष्ट निकष व उपाय असतील.
स्थानिक नागरिक आणि काही राजकीय प्रतिनिधींनी बिबट्यांना वन्य जीव संरक्षण कायदा, 1972 मधील शेड्युल-1 मधून काढून शेड्युल-2 मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे मानवी अधिवासातील बिबट्यांना ठार करण्यास परवानगी मिळावी, त्यांनी हा फरक केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, वन विभाग व पर्यावरणतज्ज्ञ हेही जाहीर करतात की, वन्यजीव संरक्षण आणि मानवी जीवाचे रक्षण यामध्ये संतुलन राखण्यास योग्य उपाय आवश्यक आहेत. केवळ ठार करण्यावर अवलंबून राहणे दीर्घकाळात पर्यावरणीय वितरण आणि जैवविविधतेवर परिणाम करू शकते.