पुणे

पुणे : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत नेत्यांचेच युद्ध रंगणार

अमृता चौगुले

सुहास जगताप

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते, प्रत्यक्ष उमेदवार यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या तालुक्यावर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचेच युद्ध रंगणार असल्याने उमेदवारांना या नेत्यांकडून चांगली कुमक मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षात प्रत्येक मतदारसंघात अत्यंत तगडे नेते इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत आमदारकी गमावलेले, काही थोडक्यात हरलेले, 2014 च्या निवडणुकीत पराभूत झालेले असे अनेक इच्छुक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेल्या दिवसापासून तयारीला लागलेले आहेत ते नेते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये आपल्या मतदारसंघावर, तालुक्यावर आपले वर्चस्व राखण्यासाठी आपलेच उमेदवार जास्तीत जास्त विजयी होऊन या संस्थांवर आपले वर्चस्व राहावे यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत.

आंबेगावात वळसे-पाटील शिवाजीराव अढळराव यांच्यात टक्कर

आंबेगाव तालुक्यात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात तालुक्यावरील वर्चस्वासाठी परंपरागत लढत या वेळी चांगलीच रंगेल कारण लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासह आगामी विजयाची पायाभरणी करण्याचा आढळरावांचा प्रयत्न असणार आहे. आढळराव पाटील आंबेगावसह संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातील या संस्थांच्या निवडणुकीत आपले कसब पणाला लावणार, हे नक्की आहे.

इंदापुरात दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुक्यात तर गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि वीस वर्षांहून अधिक काळ राज्यमंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री राहिलेले, भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे, त्यांनी एकमेकांवर टीका केली नाही असा एकही दिवस जात नाही. सध्याही सर्वात जास्त पक्षांतरे आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांचे डावपेच इंदापूर तालुक्यातच मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. शिरूरमध्ये विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे अशोक पवार यांना भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तगड्या उमेदवाराला कात्रजचा घाट दाखवून विजयी झालेले प्रदीप कंद आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबूराव पाचर्णे या राजकारणात कसलेल्या जोडीशी दोन हात करावे लागणार आहेत.

पुरंदरमध्ये संजय जगताप विजय शिवतारे आमने सामने

इंदापूरसारखीच थोडी फार स्थिती पुरंदर तालुक्यात आहे. येथेही काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप आणि गेल्या निवडणुकीत त्यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांची व्यूहरचना सुरू आहे. पुरंदरमध्ये सासवड आणि जेजुरी अशा दोन नगरपालिका असल्याने तर या संघर्षाला चांगलीच धार आली आहे. जगताप आणि शिवतारेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी
सोडत नाहीत. दौंडमध्ये भाजपचे एकमेव आमदार राहुल कुल यांना तालुक्यावर आगामी विधानसभा निवडणुकीकरिता प्रभाव कायम ठेवण्यासाठी गेल्या वेळी त्यांच्याकडून अत्यंत अल्पशा मतांनी हरलेल्या माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांच्याशी 'काटे की टक्कर' करावी लागणार आहे.

जुन्नरमध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके विरुद्ध माजी आमदार शिवसेनेचे शरद सोनवणे आणि भाजपच्या आशाताई बुचके आपलेच तालुक्यावर वर्चस्व राहावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याने उमेदवारांना आपल्या नेत्यांच्या 'भरघोस' पाठिंब्याची खात्री आहे.
खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते यांच्याशी शिवसेनेचे माजी आमदार दिवगंत सुरेश गोरे यांचे चुलत बंधू नितीन गोरे, बाबाजी काळे यांच्यासह भाजपचे अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील यांच्यात सामना होईल. भोर-वेल्हा-मुळशीमध्ये आमदार संग्राम थोपटे यांच्या समोर कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे, विक्रम खुटवड यांचे आव्हान असेल.

बारामती तालुक्यात गटबाजीचे आव्हान

बारामती तालुक्यात सबकुछ उपमुख्यमंत्री अजित पवार अशी स्थिती दिसत असली तरी भाजपचा वाढता प्रभाव आणि बारामतीतील सर्व निवडणुका गंभीरपणे लढविण्याचा भाजपने केलेला निर्धार पाहता गटबाजीने पोखरलेले आणि कार्यकर्त्यांचे असलेले हेवेदावे या स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये उफाळून येऊ नये याची काळजी अजित पवार यांना घ्यावी लागणार आहे, अन्यथा भाजपला बंडखोरीतून चांगल्या उमेदवारांची कुमक मिळण्यात अडचण येणार नाही. गेल्या बारामती न. पा. च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिग्गजांना हरवून असे चार उमेदवार विजयी झालेले होते, हा इतिहास विसरता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT