पुणे : सोशल मीडियाच्या दुनियेत रमणाऱ्या तरुण पिढीला लोककला काय माहीत असणार, असेही बोलले जाऊ लागले. पण, आता तसे चित्र राहिलेले नाही. लोककलांच्या सादरीकरणात अन् लोककलेचे शिक्षण घेण्यातही आता तरुणाई अग्रेसर आहे. राज्यभरात ठिकठिकाणी तरुणाईचे लोककलांचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. या कार्यक्रमांना राज्यभरातील महत्त्वाच्या शहरातूनच नव्हे, तर ग्रामीण भागातूनही मोठी मागणी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे कार्यक्रम हाऊसफुल्ल होत असून, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये लोककलांच्या कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे तरुण लोककलावंतांचे लोककलांचे रील्सही इन्स्टाग्राम, फेसबुकवर गाजत आहेत.(Latest Pune News)
शाहिरी, नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, भारूड, पोवाड्याचे कार्यक्रम, जागरण -गोंधळ, महाराष्ट्राची लोकधारा अशा विविध लोककलांचे कार्यक्रम यात्रा-जत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सादर व्हायचे...जुन्या कलावंतांनी महाराष्ट्रातील अस्सल लोककलांची परंपरा जिवंत ठेवली अन् वाढवली सुद्धा...पण, पुढे ही लोककला लोप पावत चालली असल्याचेही बोलले जाऊ लागले. मात्र, आता लोककलांच्या दुनियेत तरुण कलावंतांचीही संख्या वाढली असून, फोक अख्यान, फोकलोक, अशा लोककला, लोकगीते आणि लोकवाद्यांच्या सादरीकरणावर आधारित विविध कार्यक्रमांनी मराठी माणसांच्या मनावर वेगळी छाप उमटवली आहे. या कार्यक्रमांमधून लोकगीतांचे सादरीकरण, लोकवाद्यांच्या वादनातून लोककलांची माहिती लोकांपर्यंच पोहचवली जात असून, कार्यक्रमांमध्ये तरुण कलावंत
मोठ्या ऊर्जेने, अभ्यासपूर्ण पद्धतीने कला सादरीकरण करत आहेत. 20 ते 35 वयागेटातील तरुणाई लोककलांचे कार्यक्रम सादर करीत आहेत. महाविद्यालयीन तरुणाई,आयटीतील नोकरदार, डॉक्टर, वकील, शिक्षक, बँकिंग अशा विविध क्षेत्रांतील तरुणाईकडून कार्यक्रम सादर करत आहे. फक्त कार्यक्रमच नव्हे तर काहीजण सोशल मीडियावरही लोकवाद्यांवरील रील्स असो वा जागरण गोंधळपासून ते कीर्तनापर्यंतचे...रील्स अपलोड करीत असून, त्यालाही खूप प्रतिसाद आहे.
मराठी मातीतील लोककलांचा वारसा तरुण लोककलावंत तरुण पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून करीत आहे. याविषयी तरुण लोककलावंत आणि मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्राध्यापक योगेश चिकटगावकर म्हणाले, मी गेल्या काही वर्षांपासून लोककलांचे कार्यक्रम सादर करीत आहे. गण, गवळण, बतावणी, भारुड, भजनाचे कार्यक्रमही मी सादर करतो. पिंगळा ही कला लोप पावत चालली असल्याचे बोलले जात असताना मी पिंगळा ही लोककलाही सादर करत आहे. कार्यक्रमांच्या सादरीकरणातून मी लोककलेचा वारसा लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
तरुण कलावंत सादर करत असलेल्या ‘फोकलोक’ कार्यक्रमात मी ढोलकी वादन करतो. आम्ही राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रम सादर करत आहोत. महाराष्ट्राच्या मातीतील लोककलांची माहिती लोकांपर्यंत पोहचावी, या उद्देशाने आम्ही तरुण एकत्र आलो आणि आम्ही सगळ्यांनी लोककलांचा अभ्यास करून कार्यक्रमाच्या सादरीकरणाला सुरुवात केली. या कार्यक्रमाला रसिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आमच्या कार्यक्रमांना तरुणही आर्वजून येत असून, लोककलांचे सादरीकरण करताना खूप आनंद मिळतो.सक्षम जाधव, तरुण लोककलावंत
माझ्याकडे नगारा आणि इतर लोकवाद्ये शिकण्यासाठी अनेक जण येतात. त्यात खासकरून तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने त्यांना मी लोकवाद्यांचे शिक्षण देतो. लोकवाद्य शिकण्याकडे तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. त्याचे कारण म्हणजे आत्ताच्या घडीला लोकवाद्यांची सोशल मीडियाद्वारे होणारी प्रसिद्धी होय. तरुण लोकवाद्यांच्या इतिहासापासून ते वाजविण्याच्या पद्धतीपर्यंतची माहिती घेत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे.सुरेश लोणकर, ज्येष्ठ लोककलावंत