

पुणे : कृषी विभागामार्फत कृषी उन्नती योजना रब्बी हंगाम 2025-26 मध्ये राबविण्यात येत असलेले उच्च प्रतीचे, सुधारित व हवामान प्रतिरोधक वाणांचे बियाणे वापरल्यास पिकांच्या उत्पादनक्षमतेत 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ करता येते. त्यासाठी बियाण्यांच्या नवीन जातींना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकासाठी ही योजना असून एकूण 45 हजार 985 हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या उत्पादकता वाढीचे प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) अशोक किरनळ्ळी यांनी दिली. (Latest Pune News)
राज्यात या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) माध्यमातून करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत कृषी विद्यापीठे व इतर संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या उच्च उत्पादक, पोषणदृष्ट्या समृद्ध आणि हवामान प्रतिरोधक नव्या वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा प्रसार करण्यात येणार आहे. गहू व हरभरा या पिकांसाठी एकूण 37 हजार 652 क्विंटल बियाण्यांचे वितरण होणार आहे. बियाण्यांच्या जुन्या वाणांचा वापर कमी करून नव्या वाणांचा समावेश बियाणे साखळीत टप्प्याटप्प्याने वाढविणे आणि बियाणे बदल, दर व वाण बदल दर वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांनी आपले सातबारा उतारे (7/12), फार्मर आयडी, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकासह महाबीजच्या अधिकृत वितरकाकडे अर्ज करावा. बियाण्यांचे वितरण व अनुदानाची सर्व नोंद साथी पोर्टलवर केली जाणार आहे. या योजनेत फक्त महाबीजद्वारे उत्पादित व 10 वर्षे किंवा त्याहून कमी कालावधीत अधिसूचित केलेली प्रमाणित बियाणे अनुदानासाठी पात्र राहतील. बियाण्यांचे वितरण “प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य‘ या तत्त्वावर केले जाईल. प्रमाणित बियाण्यांच्या वितरणावर 50 टक्के अर्थसहाय्य उपलब्ध असून प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्रासाठीच लाभ मिळेल.
गहू पिकासाठी : वाण : पुसा वाणी (एचआय-1633), डिबीडब्लु-168, पिडीकेव्ही सरदार, फुले समाधान (एनआयअेडब्ल्यू-1944) एकूण किंमत: ?55.00 प्रति किलो - शासन अनुदान: 20 रुपये प्रतिकिलो राहील. शेतकऱ्यांसाठी बियाणांचा दर 35 रुपये प्रतिकिलो राहील.
हरभरा (सामान्य वाणांसाठी) : वाण: बिजी-20211 (पुसा मानव), पिडिकेव्ही कनक, आरव्हीजी-204, फुले विश्वराज, सुपर अनेगीरी, जेजी-24, बिजी - 10216 (पुसा चिकपी), बिजी - 30-62 (पुसा पार्वती), एकेजी - 1109 (पिडिकेव्ही कांचन), फुले विक्रांत/विक्रम ः- एकूण किंमत ः 113 रुपये प्रति किलो. शासन अनुदान 50 रुपये प्रति किलो आणि शेतकऱ्यांसाठी बियाणांचा दर 63 रुपये प्रति किलो राहील.
हरभरा (बीडीएनजीके 798 वाणासाठी) : एकूण किंमत 135 रुपये प्रति किलो. शासन अनुदान -50 रुपये प्रतिकिलो आणि शेतकऱ्यांसाठी बियाणांचा दर 85 रुपये प्रतिकिलो.