Yerwada Civic Meeting Pudhari
पुणे

Pune Yerwada Civic Meeting: येरवड्यात मोहल्ला कमिटी बैठकीवर नागरिकांचा संताप; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजी

सात महिन्यांनंतर झालेल्या बैठकीतही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विविध नागरी समस्या पुन्हा मांडल्या

पुढारी वृत्तसेवा

येरवडा: येरवडा क्षेत्रीय कार्यालयात अखेर सात महिन्यांनंतर मोहल्ला कमिटी बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. प्रश्न आणि समस्या मांडायच्या तरी कशा? असा सवाल या वेळी नागरिकांनी उपस्थित केला. स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था, अतिक्रमणांसह विविध समस्या या वेळी मांडण्यात आल्या.

येरवडा क्षेत्रीय कार्यालयात गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी मोहल्ला कमिटीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाकडून निवडणुकीचे कारण देत गेल्या सात महिन्यांपासून या बैठकीचे आयोजन करण्यात आले नव्हते. यामुळे कमिटीच्या सदस्यांसह नागरिकांतून नाराजी व्यक्त होत होती. अखेर प्रशासनाला लाज आली आणि गेल्या 30 एप्रिल रोजी ही बैठक पार पडली.

येरवडा मासळी बाजार परिसरातील स्वच्छतागृहाच्या देखभालीबाबत केअर टेकरकडून हलगर्जीपणा होत आहे. यामुळे या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, दरवाजे तुटलेले आहेत. या स्वच्छतागृहाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. सलमा शेख म्हणाल्या, ‌‘येरवडा भाजी मार्केट परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात यावी.‌’

परिसरातील काही स्वच्छतागृह पाडून त्यावर घरे बांधण्यात आल्याचा आरोप दिलीप कुराडे यांनी केला. तसेच जुने रेकॉर्ड काढून याबाबत आयुक्तांना माहिती देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. एजाज खान म्हणाले, ‌‘परिसरातील विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी प्रभाग समिती अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा.‌’ इंद्रप्रस्थ उद्यान बंद करून ही जागा एका व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळावी, अशी मागणी कमिटीच्या सदस्यांनी प्रशासनाकडे केली.

या वेळी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त राजेश गुर्रम, आरोग्य अधिकारी डॉ. गोपाळ उजवणकर, करीम खान, प्रमोद देवकर पाटील, शशिकांत साटोटे, एजाज खान, कीर्ती माचरेकर, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

...अन्‌‍ अधिकाऱ्यांना भरवले पेढे!

सात महिन्यांनंतर येरवडा क्षेत्रीय कार्यलयात मोहल्ला कमिटीची बैठक पार पडली. प्रशासनाला उशिरा का होईना जाग आल्याने मोहल्ला कमिटीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना पेढे भरवून त्यांचे आभार मानले. नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी यापुढे ही बैठक वेळेवर घेण्याची मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT