Yerwada Jail  Pudhari
पुणे

Pune Yervada Jail Prisoner Escape: येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पसार

मोबाईल चौकशीच्या भीतीने कैद्याने घेतला पलायनाचा मार्ग; पोलिसांकडून शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: येरवडा कारागृहातील शेतीत सापडलेल्या मोबाईलच्या चौकशीच्या भीतीने जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे.

याप्रकरणी तुरुंगाधिकारी श्रेणी 2 नागनाथ महादेव भानवसे (वय 55, रा. मांजरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 8 मे रोजी दुपारी दीड ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंगारेला साताऱ्यातील भुईंज पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा कैदी कोल्हापूर खुल्या जिल्हा कारागृहातून 19 ऑक्टोबर 2025 पासून येरवड्यातील जिल्हा खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आला होता. त्याला केशकर्तनालयात काम देण्यात आले होते.

दरम्यान, अधीक्षकांसह वरिष्ठ तुरुंगाधिकारी हे 8 मे रोजी कारागृहाच्या शेती विभागाची पाहणी करत असताना तुती बागेत जवळ बेवारस, सीमकार्ड नसलेला मोबाईल आढळून आला. या मोबाईल संदर्भात भिंगारेसह दुसऱ्या एका कैद्याची चौकशी केली जाणार होती. ‌

‘सायंकाळच्या जेवणानंतर येतो‌’, असे सांगून बराकीकडे गेला. मात्र, चौकशीसाठी पुन्हा बोलावले असता, तो बराकीत आढळून आला नाही. कारागृहातील शेती व परिसरात शोध घेतला असता भिंगारे सापडला नसल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सत्रे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT