पुणे

पुणे : मातीचा ढिगारा कोसळून मजुराचा मृत्यू

अमृता चौगुले

किरकटवाडी : पुढारी वृत्तसेवा

ड्रेनेज लाइन करण्यासाठी खोदलेल्या पंधरा ते वीस फूट खोल चरात काम करताना अंगावर मातीचा ढिगारा पडून गाडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील डेस्टिनेशन सेंटर समोरील रस्त्यावर सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली.
परशुराम रंगाप्पा मॅगेरी (वय 26, रा. गोखलेनगर, वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. त्याचा चुलत भाऊ अक्षय बाबू मॅगेरी याने फिर्याद हवेली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

नांदेड सिटी येथील डेस्टिनेशन सेंटरच्या समोरील रस्त्यावर सरदार पिलाजी जाधवराव यांच्या स्मारकाच्या पाठीमागे नांदेड सिटीचे ड्रेनेज लाइनचे काम चालू आहे. त्यासाठी रस्त्यात साधारण पंधरा ते वीस फूट खोलीचा चर खोदण्यात आला आहे. चरात सिमेंटचे पाइप टाकण्याचे काम सुरू आहे तर काही भागात चर खोदण्याचे काम सुरू आहे. घटनेच्या ठिकाणी परशुराम मॅगेरी आणि इतर चार-पाच मजूर 15 ते20 फूट खोल चरात काम करत असताना वरील बाजूने अचानक ठिसूळ असलेला मातीचा ढिगारा पडून त्याखाली परशुराम मॅगेरी गाडला गेला.

मजुरांनी आरडाओरडा करून मदत मागितली. घटनास्थळापासून जवळच असलेले पुणे महानगर व क्षेत्र विकास प्राधिकरणचे अग्निशामक दलाचे प्रमूख सुजित पाटील जवानांसह तत्काळ दाखल झाले. जवानांनी घटनास्थळी मातीचा ढिगारा बाजूला काढून परशुराम यास बाहेर काढले. पोलिसांनी त्यास रुग्णालयात दाखल केले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निरंजन रणवरे करत आहेत.

SCROLL FOR NEXT