पुणे

वडगाव दरेकरचे काम चार महिन्यांपासून बंदच : कोटी रुपये खर्च पाण्यात

Laxman Dhenge

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : सुमारे दीड कोटी खर्चाच्या जलजीवन मिशनच्या वडगाव दरेकर (ता. दौंड) गावच्या पाणी योजनेचा अधिकार्‍यांच्या भोंगळ कार्यप्रणालीमुळे गोंधळ होऊन योजनेचे काम अडचणीत आले आहे. अधिकार्‍यांच्या या कार्यप्रणालीचा फायदा अलगद ठेकेदारांना मिळाला असून, गेले चार महिने काम बंद ठेवले आहे. या सर्व गोंधळाचा कधी अधिकारी तर कधी ठेकेदार फायदा घेता येत असून, नागरिकांसाठी होणारी योजना मात्र त्यांच्या भल्यापेक्षा यांच्याच भल्यासाठी केलेली आहे की काय? असा प्रश्न कारभाराकडे पाहिल्यावर उपस्थित होतो.

वडगाव दरेकर गावात सध्या काही वर्षांपूर्वी केलेली पाणी योजना सुरू आहे. या गावच्या परिसरात क्षारपड जमिनीचा मोठा परिसर असल्याने पिण्यासाठी योग्य पाणी मिळणे अवघड झाल्याने देऊळगाव राजे रस्त्यावर विहीर पाडून त्यातून पाणी पेयजल योजनेतून नेण्यात आले होते. ही योजना सुरू असतानाच सध्या जलजीवनअंतर्गत 7 ऑक्टोबर 2022 रोजी जवळपास दीड कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली. काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिनांक 6 सप्टेंबर 2023 पर्यंत होती.

योजनेतून गावात दीड लाख लिटर पाण्याची उंच टाकी, उद्भवव्यवस्था ते उंच टाकीपर्यंत जवळपास सात किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे हे काम होते. योजनेची मुदत संपली असताना योजनेतील विहिरीचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे. मागील तीन दिवसांपूर्वी तो सोडविण्याचा प्रयत्न झाला. विहिरीसाठी जागा मिळवली आहे. गेले वर्षभर या योजनेचा आत्मा असलेली विहीरच अडचणीत होती. या विषयाकडे गांभीर्याने पाहिल्यास उद्भवच नसलेल्या योजनेसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नळ पाणीपुरवठा विभागाने दीड कोटी रुपये कसे काय दिले? शिवाय काम सुरू करून कामाची मुदत संपेपर्यंतसुद्धा हा प्रश्न तसाच भिजत का ठेवला? हा या अधिकार्‍यांच्या भोंगळ कारभाराचा नमुनाच म्हणावा लागेल. या गोंधळाने ठेकेदारही चार महिने काम बंद ठेवून निवांत बसला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT