

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरसाठी आजचा दिवस उल्लेखनीय आहे. आता मागील ७० वर्षांमध्ये राज्यातील जनतेची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण होणार आहेत. कलम ३७० हटविल्यानंतर घराणेशाहीच्या तावडीतून बाहेर पडलेल्या जम्मू-काश्मीरची वाटचाल विकासाकडे सुरु आहे. एकेकाळी राज्यातून बॉम्ब, बंदुका, अपहरण, फुटीरतावादाशी संबंधित बातम्या येत होत्या. मात्र आता जम्मू-काश्मीर विकासाच्या संकल्पाने पुढे जात आहे. विकसित जम्मू-काश्मीरसाठी आम्ही शपथ घेतली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२०) केले.
जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 32.5 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण झाले. यानंतर जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरशी माझे चाळीस वर्षांपासून संबंध आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकेकाळी शाळा जाळल्या जात होत्या, आज असे दिवस आले आहेत की, शाळा सजवल्या जातात. यापूर्वी राज्यातील जनतेला गंभीर आजारावर उपचारासाठी दिल्लीला जावे लागत होते; पण आता जम्मूमध्येच एम्स तयार आहे. जम्मू-काश्मीर घराणेशाहीचे बळी पडले. आता राज्य समस्येच्या गर्तेतून बाहेर पडत आहे."
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा कलम ३७० होता. ही भिंत भाजप सरकारने पाडली आहे. आज एक ट्रेन श्रीनगर ते सांगलदान आणि सांगलदान ते बारामुल्लासाठी रवाना झाली आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा देशवासीय रेल्वेने काश्मीरला पोहोचतील. आज काश्मीरला पहिली इलेक्ट्रिक ट्रेन मिळाली आहे. आता जम्मू-काश्मीरला दोन वंदे भारत ट्रेनची सुविधा देण्यात आली आहे."
आज 3200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे. आज प्रतिकूल हवामान, थंडी आणि पाऊस असूनही राज्यातील जनता मोठ्या संख्येने स्क्रीन लावून बसले आहेत. जम्मू-काश्मीरच्या लोकांचे हे प्रेम आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये २८५ ब्लॉक्समध्ये अशाच प्रकारचे स्क्रीन्स लावून हा कार्यक्रम पाहिला जात आहे.जम्मू-काश्मीरमध्ये इतक्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
जम्मू-काश्मीरचे सौंदर्य, परंपरा आणि आदरातिथ्य यासाठी संपूर्ण जग येथे येण्यास उत्सुक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दोन कोटींहून अधिक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. गेल्या दशकात वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सर्वाधिक संख्या गेल्या वर्षी नोंदवण्यात आली होती. काश्मीरच्या खोऱ्यात येणारे स्वित्झर्लंडला जायचे विसरतील, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.