मराठा आरक्षण विधेयक मंजुरीचे स्‍वागत; पण ओबीसीतून हक्‍काचे आरक्षण मिळविणारच : जरांगे पाटील

जरांगे पाटील ( संग्रहित छायाचित्र )
जरांगे पाटील ( संग्रहित छायाचित्र )

वडगोद्री, पुढारी वृत्तसेवा :  विधानसभेत मराठा आरक्षण एकमताने मंजूर झाले याचे स्‍वागतच आहे. पण ही आमची मागणी नव्‍हती. आम्‍ही ओबीसीतून आमचे हक्‍काचे कुणबी आरक्षण मिळविणारच, असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.२०) केला. मराठा आरक्षणासाठीच्‍या आंदोलनाची पुढील दिशा उद्‍या जाहीर करु,  ओबीसी आरक्षणातच आमचं हक्काचं आरक्षण आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान जरांगे यांनी सलाईन काढले असून, उपचार घेणे बंद केले आहे.

 विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर केले. त्यानंतर जरांगे पत्रकार परिषदेत बोलत होते.

आज त्यांनी सगे-सोयरे बाबतीत निर्णय घ्यायला हवा होता. ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय, त्यांची तुम्ही चेष्टा करत आहात. ही आमची आडमुठी भूमिका नाही. ही भूमिका आडमुठी असती तर ६ महिने वेळ दिला नसता. उद्या आमच्या आंदोलणाची दिशा ठरल्यावर यांना मराठ्यांची गरज समजेल. निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या भविष्याचे पाहिले, आमच्या लेकरांच्या भविष्याचे आम्ही बघू , असा इशारा त्यांनी सरकारला दिला.उद्या आंदोलनाची दिशा ठरवली की, सगळे उघड होईल. आम्ही उद्या बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. अन्न आणि पाण्याविना उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. महाराष्ट्रातील सगळ्यांनी या बैठकीला यावे.

सगेसोयरे अध्यादेशावर ६ लाख हरकती आल्या त्याची वर्गवारी सुरू आहे. त्याला वेळ लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्याच्यावर तुमचा विश्वास नाही का ? यावर मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला नसता तर हे आंदोलन ६ महिने चालले नसते. सरकार चालवताना त्यांना मर्यादा आहेत, तशा आमच्या समाजाला आहेत. आमची पोरं २०-२० वर्ष शिक्षणात घालवतात. निवडी होतात पण नियुक्त्या होत नाहीत. त्यामुळे वेगळे आरक्षण टिकणारे असेल, यात शंका आहे. आलेल्या हरकती हा सरकारचा विषय आहे. आमच्या शिंदे यांच्यावर विश्वास आहे की ते अजुनही सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करतील.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news