पुणे

इंदापूर : दोडक्याच्या पिकासाठी केलेला तारांचा मांडव तोडला

अमृता चौगुले

इंदापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तरंगवाडी (ता. इंदापूर) गावातील अशोक अंकुश व्यवहारे या शेतकर्‍याच्या दोन एकर शेतात दोडक्याच्या पिकासाठी उभा केलेला लोखंडी तारांचा मांडव अज्ञाताने धारदार हत्याराने कापल्याने तो जमिनदोस्त झाला. यामध्ये व्यवहारे यांचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. व्यवहारे यांनी मागील दीड ते दोन महिन्यापूर्वी तरंगवाडी गावात गट नंबर 71 चा 2 ब माळरानावर आपल्या दोन एकर शेतात दोडका या भाजीपाला पिकाची लागवड केली होती.

यासाठी जवळपास अडीच लाख रुपये खर्चून त्यांनी लोखंडी तारांचा मांडव उभा केला होता. या मांडवावर दोडक्याचे पीक बहरले होते आणि व्यवहारे यांना या दोडका पिकाचे दोन ते तीन तोडेदेखील मिळाले होते. प्रतितोडा दोन ते तीन टन उत्पादन त्यांना मिळत होते. दोडक्याला बाजारात 45 ते 55 रुपये प्रतिकिलो असा दर मिळत होता. यातून त्यांना दहा लाख रुपये उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, कोणाच्या तरी वाईट हेतुमुळे एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले.

अशोक व्यवहारे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (दि. 10) सायंकाळी आपल्या माळवाडी नंबर एक या ठिकाणच्या घरी मुक्कामी गेले. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि. 11) सकाळी त्यांना शेजारी असणार्‍या शेतकर्‍याचा फोन आला आणि दोडक्याचा अख्खा मांडव आडवा झालाय असे सांगितले. यानंतर व्यवहारे यांनी शेतात येऊन बघितले असता कोणीतरी अज्ञाताने खोडसाळपणाने शेतातील पिकाचे नुकसान केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. या संदर्भात आपण इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे व्यवहारे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT