भिगवण : गावरान प्रजातीचा कानस जातीचा मासा म्हटले की डोळ्यासमोर येतो काळा मासा. पण, उजनी जलाशयात मात्र पहिल्यांदाच चक्क पांढऱ्या रंगाचा कानस मासा सापडला आहे. ही दुर्मीळ बाब मानली जात आहे.(Latest Pune News)
इंदापूरचे मत्स्यतज्ज्ञ डॉ. रणजित मोरे व अविनाश सूर्यवंशी यांना भिगवण येथील मासळी बाजारात अंबिका फिश मार्केटवर आल्यानंतर विक्रीला आलेला हा कानस (लेबिओ कालबसु) मासा त्यांना आढळून आला. निसर्गात नेहमी चमत्कारिक गोष्टी पहावयास मिळतात. त्यामध्ये आपण कधी पांढरा कावळा, पांढरा पारवा किंवा इतर पक्षी अपवादात्मक पाहतो, तेव्हा त्याचे कुतूहल वाढते. अर्थात त्याचप्रमाणे आता पाण्यातील सापडलेला मासा हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
हा मासा शुक्रवारी (दि. 31) विक्रीसाठी अंबिका लिलाव मार्केटवर आला होता. मच्छिमारांना याचे महत्त्व किंवा गांभीर्य नव्हते. मात्र मोरे यांच्या नजरेतून त्याचे वेगळेपण सुटले नाही. त्यांनी तो मासा अभ्यासासाठी खरेदी केला आहे. त्यानंतर या माशाच्या वेगळेणाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. जलाशय, तलाव, नद्या-नाल्यांमध्ये असे सर्वत्र हा कानस प्रजातीचा मासा आढळून येतो. साधारण पाच ते सहा किलो वाजनापर्यंत हे मासे आढळून येतात. सामान्यपणे हा मासा पूर्णपणे काळ्या रंगाचा असतो व चवीला देखील चांगला मानला जातो.
आता उजनीत पहिल्यांदाच सापडलेला हा पांढऱ्या रंगाच्या माशाचे संशोधन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या रंगाबाबत उलघडा होणार असल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. सध्या तरी पांढऱ्या कावळ्या प्रमाणे रंगद्रव्याच्या अभावामुळे हा मासा देखील पांढरा असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
उजनी धरणात डॉ. रणजीत मोरे यांनी 56 प्रजातींचा अभ्यास झालेला शोध निबंध प्रकाशित झालेला आहे. विशेषतः गंगा व बम्हपुत्रातील काही जातींचे मासे उजनीत आढळल्याची नोंद केली आहे. त्यातच आता पहिल्यांदाच कानस जातीचा पांढरा मासा आढळून आल्याच्या नोंदीची भर पडली आहे.
या पांढऱ्या रंगाच्या कानस जातीच्या माशामागे रंगद्रव्याचा अभाव असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ल्युसिझम नावाच्या आनुवंशिक स्थितीमुळे तयार होतो. शरीरातील रंगद्रव्य कमी होते त्यामुळे त्याचा रंग पांढरा होतो, असे मत डॉ. रणजित मोरे व सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.