पुणे : देशांतर्गत गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने फेब्रुवारीपासून गव्हाच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली. यादरम्यान केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी आणल्याने ही वाढ शंभर रुपयांनी कमी झाली आहे. मात्र, येत्या काळात गव्हाचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात रोज 10 ते 15 ट्रकमधून 30 टन गहू बाजारात दाखल होत आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातून ही आवक होते. यामध्ये लोकवन, तुकडी, सिहोर या गव्हाचा समावेश आहे. मार्केट यार्डात सर्वाधिक गहू मध्य प्रदेशातून येतो. त्यापाठोपाठ गुजरात, राजस्थान व राज्यातून गव्हाची आवक होते. हंगामाच्या सुरवातीला गव्हाचा प्रतिक्विंटलचा कमीत कमी 2 हजार 600 ते 2 हजार 650 रुपये दर निघाला.
स्वस्ताई अल्पकाळ राहणार
गव्हाच्या दरात स्वस्ताई आली असली, तरी ती अल्पकाळ राहणार आहे. कारण देशात गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यात सरकाराने रेशनवरील गव्हाचे प्रमाण पाच किलोवरून दोन किलोवर आणले आहे. त्यामुळे खुल्या बाजारात गव्हाला चांगली मागणी राहून दर चांगले मिळतील, या अपेक्षेने शेतकरी वर्गही खुल्या बाजारात गव्हाची मोठ्या प्रमाणात विक्री करण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली. सणासुदीच्या काळात आटा, मैदा, रवा यासाठी विविध कंपन्यांकडून गव्हाला मागणी राहील. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या मालापेक्षा मागणी जास्त राहून दरवाढ होण्याची शक्यता आहे.
उत्पादन घटल्याचा परिणाम
रशिया-युक्रेन युद्धामुळे या देशांतून होणारी गव्हाची निर्यात थांबली. तर जे देश या देशांकडून गहू खरेदी करीत होते त्यांनी आपला मोर्चा इतर देशांकडे वळविला. देशात गव्हाच्या उत्पादनात झालेली घट तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ, कोरोनाकाळात सरकारने दोन वर्षे गव्हाचे वाटप केल्याने खाली झालेल्या सरकारी गोदामांमुळे गव्हाच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली.
उत्पादन घट होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कंपन्यांनी सुरुवातीला नवीन मालाची खरेदी केली. त्यानंतर, तत्काळ गव्हाच्या क्विंटलमागे दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढ झाली.
मार्केट यार्डात गव्हाला मिळणारे दर
गहू फेब्रुवारीत दर सध्याचे दर
(प्रतिक्विंटल) (प्रतिक्विंटल)
एमपी लोकवन 2550 ते 3300 2700 ते 3500
एमपी तुकडी 2650 ते 3200 2800 ते 3400
गुजरात लोकवन 2750 ते 3200 2900 ते 3400
गुजरात तुकडी 2650 ते 3000 2800 ते 3200
एमपी सिहोर 4750 ते 5300 4900 ते 5500
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.