पुणे : देशातील सर्वात मोठी समस्या ही पाणीसंवर्धन आहे. जगात पाण्याची भीषण परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर पाणी प्रश्न समजून घेतला गेला पाहिजे. भविष्यातील पिढीसाठी पाणीसंवर्धन करणे आवश्यक आहे. पाणी आणि शेती याशिवाय लोक जगू शकणार नाही, असे मत ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'जलमित्र” पुरस्कार' या वर्षी निवृत्त सनदी वनाधिकारी डॉ. अजित पटनाईक यांना प्रदान करण्यात आला. याबरोबरच डॉ. मोहन धारियांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. धारियांना लक्षवेधी सन्मान (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांचे नातू सागर धारिया आणि वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर यांनी स्वीकारला. या वेळी यशदा, पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक व सचिव डॉ. अरुणचंद्र पाठक, सुनील जोशी, अनिल पाटील, राजेंद्र शेलार उपस्थित होते.
डॉ. प्रभू म्हणाले, चिल्का तलाव आशियातील खाऱ्या पाण्याचा मोठा प्रकल्प आहे, त्यामुळे स्थलांतरित पक्ष देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात त्यामुळे जैवविविधता समृद्ध होते. राजकारणात देखील सध्या अनेकांचे विविध पक्षात स्थलांतर सुरू आहे. स्थलांतरित पक्षांमुळे स्थानिक जैवविविधता समृद्ध होत असते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पटनाईक म्हणाले, हा पुरस्कार जलाशय संवर्धनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पर्यावरणप्रेमीचा आहे. महाराष्ट्र विकास केंद्र पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. चिल्का सरोवर संवर्धन करण्यासाठी अनेक वर्ष आम्ही काम केले आहे त्याची दखल जगाने देखील घेतली याबद्दल समाधान आहे.