

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शहर पातळीवर एकमत झाले आहे. मात्र, काँग्रेसबरेबर सुरू असलेल्या वाटाघाटी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. शिवसेनेचा कल ही कळलेला नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची शुक्रवारी बैठक होणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे. त्यामध्ये जागा वाटपावर चर्चा करून वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येण्यासंदर्भातील घोषणा आता रविवारी होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, या दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू केली होती. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून निवडणूक एकत्र लढण्यावरून बैठका सुरू होत्या. दरम्यान, दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. विशेषतः कॉंग्रेस स्वबळावर जाण्याच्या मार्गावर असल्याने जागा वाटपाचे गणित बिघडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा वाटपाचे गणित पुन्हा एकदा जुळवावे लागणार आहे.
गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी गटनेते अशोक हरणावळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, कार्याध्यक्ष रूपाली ठोंबरे आदी उपस्थित होते. मात्र, त्यावेळी पुण्यातील जागा वाटपाबाबत चर्चा झाली नसल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
- दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढणार
- घोषणा मात्र रविवारी होण्याची शक्यता
- शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची शुक्रवारी बैठक
- अजित पवार गटात अशोक हरणावळ यांचा प्रवेश