Warje Popular Nagar Development Pudhari
पुणे

Warje Popular Nagar Development: वारजे पॉप्युलर नगरमध्ये बदलाचा शब्द; भारतभूषण बराटेंची विकासदृष्टी

वाहतूक, कचरा, ड्रेनेज आणि डीपी रस्त्यांवर लक्ष; नवनियुक्त नगरसेवकांचा ठोस कृतीआराखडा

पुढारी वृत्तसेवा

वारजे: वारजे पॉप्युलर नगर प्रभागामधील होणारी वाहतुकीची कोंडी, कचरा समस्या, ड्रेनेज, पावसाळी वाहिन्या, भाजी मंडई आदी विविध समस्यांवर पुढील काळात काम करणार असल्याचा विश्वास भाजपचे नवनियुक्त नगरसेवक भारतभूषण शरद बराटे यांनी व्यक्त केला. भारतभूषण बराटे यांनी दैनिक पुढारी कार्यालयास भेट देत प्रभागातील विविध समस्यांवर काढण्यात येणारा तोडगा आणि नव्याने करण्यात येणारी विविध विकासकामे याबाबत माहिती दिली.

भारतभूषण शरद बराटे हे प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलरनगर येथून ‌’ब‌’ गटातून 34 हजार 118 अशा विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या किरण बारटक्के यांचा पराभव केला. त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती देतांना बराटे म्हणाले, माझे शिक्षण सिव्हिल इंजिनियर झाले आहे. वयाच्या 19 व्या वयापासून माझे वडील शरद बराटे आणि काका माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या माध्यमातून समाजात काम करण्यास सुरुवात केली. 2017 च्या महापालिका निवडणुकीत काका दिलीप बराटे यांच्यासोबत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यानंतर प्रभागात सक्रिय सहभाग घेत त्यांच्या माध्यमातून प्रशासनामार्फत विविध विकासकामे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोविड काळातील परिस्थितीमध्ये प्रभागातील नागरिकांना दवाखान्यासाठी मदत करत वारजे माळवाडी, रामनगर, सहयोगनगर, गोकुळनगर पठार आदी भागांत सहकाऱ्याच्या मदतीने अन्नधान्याचे व आरोग्याचे मोफत किट वाटप करण्यात आले.

माळवाडीत जनसंपर्क कार्यालय खुले करीत प्रभागातील कोविडबाधीत रुग्नासाठी मारुतीराया कोविड सेंटर सुरू केले. त्यामध्ये अनेक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. तसेच माळवाडी येथील गोकुळनगर पठार येथील लोकवस्तीसाठी चा खराब अवस्थेतील रस्ता जो पावसाच्या दिवसांत नागरिकांना चालणे अगदी कठीण असलेला रस्ता स्वखर्चाने काँक्रिटीकरण केला. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली. 2022 ची महापालिका निवडणूक मी आणि माझे काका दोघेही लढविणार होतो, त्यानुसार काम देखील सुरू होते.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर सर्व जनता त्यांच्याकडे आकर्षित होती, त्यानुसार मी देखील त्यांची प्रेरणा घेऊन भाजपमधून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने काम सुरू केले. मुरलीधर मोहोळ महापौर झाल्यावर प्रभागातील अग्निशमन केंद्र समस्या आणि विविध कामांसाठी त्यांना भेटून काम सुरू ठेवले. मात्र, ही निवडणूक होऊ शकली नाही. 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत गेल्या काही वर्षांपासून मी केलेल्या कामाचा मला थेट फायदा झाला आणि मी निवडून आलो. आता प्रभागातील समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे देखील बराटे यांनी सांगितले.

प्रभागात करणार ही कामे

  • वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

  • कचरासमस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

  • रखडलेला नदीलगतचा डीपी रस्ता आणि डुक्कर खिंड ते तिरुपती नगर डीपी रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार

  • दररोज प्रभागात फेरफटका मारून समस्या जाणून काम करणार

  • पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी साचू नये यासाठी नियोजन बद्ध काम करणार

  • सुसज्ज रस्ते आणि पार्किंग व्यवस्थेसाठी प्रयत्न करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT