पुणे: मतमोजणी यंत्रे परस्पर बदलणे, मतदान यंत्रांना सिल नसणे, काही मतदान यंत्रांवर सर्व उमेदवारांच्या नावाचा व त्यांना पडलेल्या मतांचा तपशीलच न दिसणे, मतांची मोजणी सुरू करण्यापूर्वीच संबंधित मशीनची मते मोजून झाली, अशा घोषणापत्रावर (व्ही. एम. - ४) उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या सह्या घेणे या व अशा विविध कारणांमुळे पौड फाट्यावरील पं. दीनदयाळ उपाध्याय इंग्रजी माध्यम शाळेतील मतमोजणी केंद्रावरील मतमोजणी प्रक्रियेत आज वारंवार अडथळे आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्धच्या घोषणा, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी केलेल्या राड्यामुळे मतमोजणी प्रक्रियाच काही काळ ठप्प झाली. यावेळी पोलिस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये झालेल्या झटापटीत एका उमेदवाराचे पती जखमी झाले. परिणामी येथे मतमोजणी होणाऱ्या एकाही प्रभागाचा निकाल सायंकाळपर्यंत जाहीर होऊ शकला नाही.
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक - २९ (डेक्कन- हॅपी कॉलनी), प्रभाग क्रमांक- ३० (कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी) आणि प्रभाग क्रमांक-३२च्या (वारजे-पॉप्युलरनगर) मतमोजणीला पं. दीनदयाळ उपाध्याय इंग्रजी माध्यम शाळेत उभारण्यात आलेल्या केंद्रात सकाळी दहा वाजता कडेकोट पोलिस बंदोबस्तात सुरू झाली अन् अगदी पोस्टल बॅलेटच्या मोजणीपासूनच येथील गोंधळाला सुरुवात झाली. प्रभाग २९मध्ये आलेली पोस्टल मते नेमकी किती? ३६ की ३७ यावरून पहिला गोंधळ झाला. त्यामुळे पोस्टल मतांची पाकिटे पुन्हा पुन्हा मोजावी लागली. अखेर पोस्टलची मते ३६च असल्याचे घोषित झाले. त्यांपैकी एका मतासोबत घोषणापत्रच नसल्याने ते मत बाद ठरविण्यात आले, तर मतपत्रिकेवर चुकीच्या ठिकाणी टिक केल्याने पाच मते बाद ठरविण्यात आली. उर्वरित तीस मते मोजण्यास मतमोजणी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तब्बल पाऊण तास घेतला.
याच वेळी प्रभाग क्रमांक २९ च्या पहिल्या फेरीच्या मोजणीला सुरुवात करण्यात आली. परंतु, केंद्रातील टेबल क्रमांक एकवर मतमोजणीसाठी आलेले मतदान यंत्र परस्पर बदलल्याची बाब उमेदवार प्रतिनिधींच्या निदर्शनास आली. मॉक ट्रायलसाठी जे यंत्र वापरले त्यावर उमेदवार वा उमेदवार प्रतिनिधींच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. टेबलावर मतमोजणीसाठी आलेल्या यंत्रावर उमेदवार प्रतिनिधीच्या सह्याच नव्हत्या. त्यामुळे सह्या दाखवा वा मतमोजणी थांबवा, अशी मागणी मनसेचे उमेदवार राम बोरकर यांनी केली. त्यांच्या प्रतिनिधींनीही जोरदार घोषणाबाजी सुरू करून ही मागणी लावून धरली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव व त्यांच्या सहाय्यक अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोरकर व त्यांच्या समर्थकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बोरकर काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. अशा गोंधळातच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी टेबल क्रमांक १२ वर आलेल्या मतदान यंत्रातील त्रुटी पुढे आली. या यंत्रावर एका उमेदवाराचा क्रमांक व त्याला मिळालेल्या मतांची माहितीच येत नसल्याची बाब प्रतिनिधींच्या निदर्शनास आली. त्यामुळे शिवसेना (उबाठा)चे उमेदवार वैभव दिघे आक्रमक झाले. त्यांनीही राम बोरकर यांच्याबरोबर घोषणाबाजीस सुरुवात केली. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या उमेदवार अॅड. वंदना कडू यांचे पती अॅड. विवेक कडू आणि शिवसेना (शिंदे) उमेदवार सुषमा ढोकळे यांचे पती अजित ढोकळे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी बोरकर यांच्या लढ्यात सहभागी झाले. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी घोषणा देऊन मतमोजणी केंद्र अक्षरशः डोक्यावर घेतले.
तास-दीड तास चाललेल्या या घोषणाबाजीमुळे मतमोजणीचे काम जवळजवळ ठप्प झाले. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रातील लोखंडी जाळ्या उचकटू लागल्याने परिस्थिती हाताबाहेर जाते, हे पाहून पोलिसांनी राम बोरकर व घोषणाबाजी करणाऱ्या उमेदवारांभोवती कडे केले. 'तुम्ही तुमची हरकत लिहून द्या, त्याला निवडणूक निर्णय अधिकारी उत्तर देतील', असे सांगून त्यांनी त्यांच्या हरकती लिहून घेतल्या व त्या अर्चना यादव यांच्याकडे पोहोचविल्या. या हरकती मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवित असल्याचे जाहीर करून त्यांनी पुढील मतमोजणी सुरू करण्याची घोषणा केली. परंतु, त्यांच्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने बोरकर व अन्य उमेदवारांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली. मतमोजणी टेबलापाशी लावण्यात आलेल्या जाळीजवळ जाऊन आरडाओरडा करणाऱ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून तेथून खेचून काढले. यावेळी उमेदवार वंदना कडू यांचे पती विवेक कडू यांच्या हातात लोखंडी जाळी रुतून ते गंभीर जखमी झाले.
बोरकर व अन्य उमेदवारांची घोषणाबाजी थांबत नाही असे दिसल्यानंतर पोलिस उपायुक्त व अन्य अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्राबाहेर काढले. पं. दीनदयाळ उपाध्याय शाळेबाहर गेल्यानंतरही मनसे, शिवसेना व इतर पक्षांच्या उमेदवारांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. यावेळी तुरळक दगडफेकीचा प्रकार घडल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस ऐकत नाही, असे दिसल्यानतर या उमेदवारांनी शाळेबाहेरच बैठक ठोकली व निदर्शने सुरू ठेवली. दरम्यान, मतमोजणी केंद्रात तिसऱ्या व चौथ्या फेरीची मतमोजणी पूर्ण होऊन त्यांची मतेही जाहीर करण्यात आली. मात्र, दुसऱ्या फेरीचे निकाल स्थगित ठेवण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. दुसऱ्या फेरीत घडलेल्या प्रकाराची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांना कळविला असून, त्यावर त्यांच्याकडून निकाल आल्यानंतरच प्रभाग २९चा निकाल जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी घोषित केले.
कर्वेनगर- हिंगणे होम कॉलनी (प्रभाग क्रमांक ३० ) च्या मतमोजणीला दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरुवात झाली. परंतु, पहिल्या फेरीलाच व्हीएम - ४ या क्रमांकाच्या फॉर्मवर मतमोजणी सुरू करण्यापूर्वीच ती पूर्ण झाली, असे मान्य असल्याच्या सह्या घेतल्याची बाब राष्ट्रवादी (श. प.) च्या उमेदवार मनीषा शितोळे यांचे पती विरेश शितोळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्याबाबत हरकत घेऊन मतमोजणी बंद करण्याची मागणी केली. या खेरीजही विविध मुद्द्यांवर त्यांनी हरकती उपस्थित केल्या. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आधी सह्या घेतलेले व्हीएम ४ अर्ज परत करण्याचे मान्य करून मते मोजून झाल्यावर ते भरून घेण्यात येतील असे जाहीर केले. त्यामुळे पाचच्या सुमारास मतमोजणीला पुन्हा सुरुवात झाली.
महिला पत्रकारांचे मोबाईल पोलिसांकडून ताब्यात
मतमोजणी केंद्रात सुरु असलेला या गोंधळाचे फोटो घेणाऱ्या महिला पत्रकारांवर काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी मोबाईल आत आणण्यास परवानगी नसताना पत्रकारांना कशी परवानगी दिली, अशी हरकत घेत मोबाईलमधील छायाचित्रे डिलिट करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे पोलिसांनी तीन महिला पत्रकारांचे मोबाईल ताब्यात घेतले.
डेक्कन- हॅपी कॉलनी प्रभागावर भाजपचाच झेंडा
मतदान यंत्रातील त्रुटींमुळे प्रभाग २९ चा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राखून ठेवला असला तरी या प्रभागातील भाजपचे चारही उमेदवार निर्विवाद विजयी झाले आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पोस्टल मतांच्या मोजणीपासून सुरू झालेली त्यांची घोडदौड चारही फेऱ्यांमध्ये सुरूच होती. अ- गटात- सुनील पांडे, ब-गटात अॅड. मिताली सावळेकर, क- गटात मंजुश्री खर्डेकर आणि ड- गटात पुनीत जोशी या भाजपच्या उमेदवारांनी चारही फेऱ्यात प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा तीन ते चार हजार मतांची आघाडी घेतली आहे.