

सुपे: निपाणी, नांदेड आणि धाराशिव येथील शेतकऱ्यांचे दोन ट्रॅक्टर, तीन जेसीबी मशीन भाड्याने घेऊन ते सासवड येथे नव्याने होणाऱ्या विमानतळावरील कामासाठी लावतो, असे सांगून शेतकऱ्याशी करारनामा करून घेऊन ट्रॅक्टर व जेसीबीची विक्री करणाऱ्या टोळीचा सुपे पोलिसांनी पर्दाफाश केला.
अजय संतोष चव्हाण ( रा. सरतळे ता. जावळी जि. सातारा ), दिनेश भाऊराव मोरे ( रा. इकलीबोर ता. नायगाव जि. नांदेड ), निलेश अण्णा थोरात (रा. मोरगाव, ता. बारामती), तुषार शहाजी शिंदे (रा. येडशी, ता. धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात निलेश अण्णा थोरात याला सुपे पोलिसांनी अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी गोविंदराव गादेवाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गादेवाड यांच्याबरोबरच शेतकरी अनिल शिवाजी वरखडे, बाबुराव ऊर्फ आप्पाराव पांढरे यांच्याशी आरोपींनी करार केला. तुमचा जेसीबी सासवड येथे नव्याने होणाऱ्या विमानतळाच्या कामावर लावतो असे त्यांना सांगण्यात आले.जेसीबी भाड्याने घेवुन प्रति महिना एक लाख रुपये प्रमाणे भाडे देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गादेवाड यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी निलेश थोरात याने दोन ट्रॅक्टर मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील शेतकऱ्यांना फायनान्स कंपनीचे ट्रॅक्टर असल्याचे भासवून विकल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी अजय संतोष चव्हाण व निलेश थोरात यांनी दिनेश भाऊराव मोरे, तुषार शिंदे यांच्याशी संगनमत करून डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांकडून तीन जेसीबी विक्री करण्याच्या उद्देशाने सुपे (ता. बारामती) येथे आणले. सुपे पोलिसांनी ते जप्त केले.
आरोपी अजय चव्हाण, निलेश थोरात व तुषार शिंदे यांचे बी. जी. कंट्रक्शन कंपनीचे बनावट कागदपत्रे तपासात निष्पन्न झाली. त्यानुसार सुपे पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, तीन जेसीबी मशीनसह ७७ लाखाच्या मुद्देमालासह थोरात यास अटक केली आहे. तर अन्य तीन आरोपीवर कळंब पोलीस स्टेशनमध्ये इतर गुन्हात अटक आहेत. यासंदर्भात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत, संदीप लोंढे, रुपेश सांळुखे, दत्ता धुमाळ, संतोष पवार, विशाल गजरे, पोलीस शिपाई किसन ताडगे, महादेव साळुंखे, तुषार जैनक, सागर वाघमोडे, निहाल वणवे, सचिन कोकणे, सचिन दरेकर, योगेश सरोदे, पियुष माळी, आदेश मवाळ आदीच्या कमेटीने आरोपीचा पर्दाफाश केला.