

उरुळी कांचन: कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे डॉक्टरचे अपहरण करून ठार मारण्याची धमकी देत तब्बल 19 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी पाच अनोळखी व्यक्तींवर उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 10 ते दि. 12 दरम्यान प्रयागधाम फाट्याच्या पुढे इनामदारवस्ती परिसरात घडली.
याप्रकरणी संबंधित डॉक्टरने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी गावात रुग्णालय आहे. शनिवारी रात्री सव्वादहा ते साडेदहा वाजता त्यांच्या कारमधून निघाले होते.
त्यांच्याबरोबर गाडीचालक व रुग्णालयातील एक मदतनीस होता. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात आले असता पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी तिघांचे अपहरण करून शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतला.
आरोपींनी फिर्यादी, त्यांचे सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपींनी 19 लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारून तिघांना ताब्यात ठेवले. हा प्रकार सोमवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता. फिर्यादी डॉक्टरांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला.
दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे व स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सिद्ध पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.