इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी स्पर्धा Pudhari
पुणे

Ward 34 Election Fight Pune: इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी स्पर्धा; तिकीट वाटपानंतर नाराजी नाट्य उद्भवण्याची शक्यता

भाजप अन्‌‍ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत होणार लढत

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 34 नऱ्हे-वडगाव बुद्रुक-धायरी.

नऱ्हे-वडगाव-धायरी या प्रभागात भाजपचे प्राबल्य असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचीही मोठी ताकद आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या तीन पक्षांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. या पक्षांसह तर पक्षांमध्येही इच्छुकांची संख्या जास्त असल्याने या प्रभागात उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण होणार असून, तिकीट वाटपानंतर नाराजी नाट्यही दिसून येण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

जुन्या वडगाव-धायरी प्रभागाला नव्याने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या धायरीचा काही भाग आणि नऱ्हे गाव जोडले आहे. मात्र वडगाव बुद्रुकचे विभाजन केल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजी आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 83 हजार 867 इतकी असून, त्यात धायरीचा वाटा सुमारे 40 हजार इतका आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या प्रभागाच्या तिकीट वाटपात धायरीचा वरचष्मा राहू शकतो. महायुती आणि महाआघाडीतील घटकपक्ष एकत्र निवडणूक लढणार का? शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येणार का? याबाबत अद्याप तरी संदिग्धता आहे. मात्र, सर्वच पक्षांतील इच्छुकांनी सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. या प्रभागात आता ‌‘अ‌’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग, ‌‘ब‌’ आणि ‌‘क‌’ गट सर्वसाधारण (महिला) आणि ‌‘ड‌’ गट सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण पडले आहे.

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, नीता दांगट, राजश्री नवले हे या प्रभागातून निवडून आले आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही उमेदवारांनाही चांगली मते मिळाली होती. यामुळे या प्रभागात भाजपचे प्राबल्य असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची ताकदही कमी नाही. यामुळे आगामी निवडणुकीत मुख्य सामना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे आणखी चुरस निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, माजी नगरसेवक विकास दांगट कोणता झेंडा खांद्यावर घेतात हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्यांची भूमिकाही प्रभागात महत्त्वाची ठरणार आहे.

या प्रभागात भाजपकडून माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, माजी नगरसेविका नीता दांगट, राजश्री नवले यांची नावे चर्चेत आहेत. तसेच अतुल चाकणकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पोकळे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, जयश्री भूमकर, माजी स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे, सारंग नवले, बापू पोकळे, माधुरी चाकणकर, सागर भूमकर, यशवंत लायगुडे, कोमल सुशांत कुटे, कोमल सतीश कुटे, मंजिरी जाधव हे इच्छुक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नऱ्हे गावचे माजी सरपंच पोपटराव खेडेकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती भूमकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा दमिष्टेे, राजेश्वरी पाटील, सुप्रिया भूमकर, स्वाती पोकळे, संतोष चाकणकर, शरद दबडे, नीलेश दमिष्टे यांचीही नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) भूपेंद्र मोरे, माजी नगसेवक अक्रूर कुदळेे हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून (ठाकरे गट) भरत कुंभारकर, महेश पोकळे, अमोल दांगट, सुनीता खंडाळकर हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून (शिंदे गट) नीलेश गिरमे, सोमनाथ कुटे यांची नावे चर्चेत आहेत. आम आदमी पक्षाकडून धनंजय बेनकर हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर पक्षांच्य उमेदवारांचीही जुळवाजुळव सुरू आहे.

... तर इच्छुकांचे पक्षांतर करणार?

भाजपकडून तिकीट न मिळाल्यास काही इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे प्रभागातील गणिते बदलू शकतात. या प्रभागातील काही भाग वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभा राहणारा, तर काही भाजपकडे झुकणारा आहे. हे सर्व लक्षात घेऊन इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

मतांच्या विभाजनाचा बसणार फटका

या प्रभागातील विरोधी पक्षांतील इच्छुक एकमेकांचे नातेवाइक असल्याने मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होणार असून, याचा फटका इतर उमेदवारांनाही बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गट पडल्याने देखील मतांचे विभाजन होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. तिकीट वाटपात नाराज झालेल्या इच्छुकांचे पॅनेल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT