

पुणे : महापालिका आयुक्तांच्या अधिकृत निवासस्थानातून किमती वस्तू गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पाच महिने उलटूनही चौकशी अहवाल लपवला जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. शहर अभियंत्यांनी चौकशीला पाच महिने लावले आणि अहवाल गोपनीय म्हणून आयुक्तांकडे पाठवला, असे सांगून वेलणकर यांनी आयुक्तांना हा अहवाल तातडीने महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याची मागणी केली.
मॉडेल कॉलनी येथील सुमारे अर्ध्या एकरावर पुणे महापालिका आयुक्तांचा बंगला आहे. सध्या या बंगल्यात आयुक्त नवल किशोर राम राहतात. त्यांच्या पूर्वीचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे या बंगल्यात राहात होते. आयुक्तपदावरून डॉ. भोसले सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी घराचा ताबा सोडला. त्यानंतर महापालिकेच्या भवन, विद्युत, सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली.
आयुक्त बंगल्यातील वस्तू गायब झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी आवाज उठवल्यावर या प्रकरणी एक समिती नेमून शहर अभियंता यांच्याकडून चौकशी पूर्ण केली जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले होते.
त्यानुसार याबाबत शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी सुरू होती. हा अहवाल अवघ्या काही दिवसांत पूर्ण व्हायला हवा होता. मात्र, तब्बल पाच महिन्यांनी हा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालाबाबत सोमवारी सकाळी वेलणकर यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत 3 ते 5 च्या कलमानुसार संबंधित कागदपत्रे पाहायची आहेत अशी मागणी शहर अभियंता वाघमारे यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी हा “अहवाल गोपनीय आहे” असे सांगत शहर अभियंत्यांनी ती माहिती न देण्याची भूमिका घेतली.
दरम्यान वेलणकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन अहवाल पाहण्याची विनंती केली. मात्र, ‘अजून मी स्वतः हा अहवाल पाहिलेला नाही; त्यामुळे तो देता येणार नाही,’ असे उत्तर आयुक्तांनी दिल्याचे वेलणकर यांनी सांगितले. हा प्रकार चिंताजनक असून, चौकशीतील विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवण्याची मागणीही त्यांनी केली.
चार एसी, झुंबर अन् बरेच काही
घरातील चार एसी, झुंबर, जुन्या काळातील पितळी दिवे, 45 आणि 65 सेंटिमिटरचे दोन एलईडी टिव्ही, कॉफी मशिन, वॉकीटॉकी सेट, रिमोट बेल्स, किचन टॉप, ॲक्वागार्ड असे साहित्य आतमध्ये नसल्याचे समोर आले होते. महापालिकेतर्फे आयुक्तांचा बंगला हा सर्व सोईंनी युक्त असा सुसज्ज ठेवला जातो. पण यातील अनेक वस्तू गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.
आयुक्त बंगल्यातील वस्तू गहाळ होणे, हा सामान्य पुणेकरांसाठीही चिंतेचा विषय आहे. यात गोपनीयतेचे कारण काय, हा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरी मंच
आयुक्त बंगल्यावरील चोरीचा अहवाल अद्याप वाचलेला नाही. हा अहवाल वाचल्यावर योग्य निर्णय घेतला जाईल.
नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका