

पुणे : पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी 193 जणांनी आणि नगरसेवकपदासाठी तब्बल 2 हजार 671 जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी उमेदवारांना अधिकृत पत्र उशिरा दिल्याने शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी (दि. 18) या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गेल्या सोमवारी सुरू करण्यात आली होती. पहिले काही दिवस उमेदवारी अर्ज भरण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस बाकी असताना सुरुवात झाली. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
बारामती नगरपरिषदेच्या सदस्यपदासाठी सर्वाधिक 298 अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल नव्याने अस्तित्वात आलेल्या आणि पहिल्यांदाच निवडणूक होत असलेल्या फुरसुंगी नगरपरिषदेच्या सदस्यपदासाठी 217 अर्ज दाखल झाले आहेत. आळंदी नगरपरिषद सदस्यपदासाठी 212 अर्ज दाखल झाले आहेत, शिरूर नगरपरिषद सदस्यपदासाठी 202 अर्ज दाखल झाले आहेत, तर दौंड नगरपरिषद सदस्यपदासाठी 177 अर्ज दाखल झाले आहेत. तसेच इंदापूर नगरपरिषद सदस्यपदासाठी 169 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
याचबरोबर बारामती नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी 22 जणांनी अर्ज केले आहेत. जुन्नर, आळंदी आणि फुरसुंगी येथे नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी 16 जणांनी अर्ज केले आहेत, तर माळेगाव नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी 119 जणांनी अर्ज केले, तर नगराध्यक्षपदासाठी 10 जणांनी अर्ज केले आहेत.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, ऑफलाइन अर्ज भरण्यास नापसंती दिसून आली. सदस्यपदासाठी 69 जणांनी आणि नगराध्यक्षपदासाठी 9 जणांनी ऑफलाइन अर्ज भरले आहेत.