Tomato Price Pudhari
पुणे

Walhe Tomato Price: टोमॅटोला २० किलोला अवघे १५० रुपये; वाल्ह्यात शेतकरी आर्थिक संकटात

एकरी लाखाहून अधिक खर्च, तरी उत्पादनाचा खर्चही निघेना; पाणीटंचाईसोबत मजुरांचाही तुटवडा

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यातच कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, प्रति २० किलोला अवघे १५० ते २०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांवर माल फेकून देण्याची वेळ आली आहे. पिकासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टोमॅटो लागवडीसाठी नांगरणी, बेड तयार करणे, ठिबक सिंचन, रोपांची लागवड, खते आणि औषधांवर खर्च करावा लागतो. पीक काढणीपर्यंत एकरी एक लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. एवढा खर्च करूनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात तरकारी पिकांची लागवड झाली होती. त्यामुळे बाजारात आवक वाढून या पिकांना चांगला भाव मिळाला नाही. सध्या कांद्याला चांगला दर मिळत असला, तरी उत्पादन कमी आहे. चांगल्या दरामुळे अनेक शेतकऱ्यांनी नव्याने कांदा लागवड केली आहे.

मात्र, यंदा अल्प पर्जन्यमानामुळे कांदा पिकाचेही नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा अल्प पाऊस झाला असतानाही अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. मात्र, सध्याचा बाजारभाव पाहता टोमॅटो बाजारात विक्रीसाठी नेण्यापेक्षा फेकून देण्याची वेळ आली आहे. पिकासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, अशी व्यथा वाल्हे येथील शेतकरी तानाजी भुजबळ यांनी मांडली.

शेतमजुरांची टंचाई

जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये महिला आणि पुरुषांना दिवसाला ५०० ते ७०० रुपये मजुरी मिळत आहे. सावलीत आणि तुलनेने कमी कष्टाचे काम मिळत असल्याने अनेक मजूर शेतीकामाऐवजी औद्योगिक वसाहतीत काम करण्यास प्राधान्य देत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT