वाल्हे: पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील शेतकरी कष्टाला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि योग्य नियोजन करत केवळ 10 गुंठ्यांत मोगरा फुलांच्या शेतीतून आर्थिक प्रगती साधत आहे. येथील सागर भुजबळ यांनी आपल्या दहा गुंठे शेतजमीन मोगऱ्याची लागवड केली आहे.
यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. कमी पाण्यात आणि कमी कष्टाच्या या मोगरा फुलांच्या शेतीत भुजबळ रमले आहेत. मोगरा फुलांच्या रोपांची लागवड केलेल्या वर्षीच उत्पादन सुरू होते.
पुण्याच्या बाजारात या मोगऱ्याला सध्या दोन हजार रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे. यामुळे त्यांना मोगरा शेतीतून चांगली कमाई होत आहे. भुजबळ यांचे पीक नवे असल्याने सध्या त्यांचे उत्पादन कमी म्हणजे 1 ते 2 किलो आहे. त्यातच बदलत्या वातावरणाचाही त्यांना फटका बसत आहे. मात्र, याच क्षेत्रातून काही दिवसांनी दररोज 5 ते 6 किलोपर्यंत उत्पादन मिळेल, असा विश्वास भुजबळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कमी खर्च, कष्ट कमी आणि शाश्वत उत्पन्न असे फुलशेतीच समीकरण लक्षात घेऊन वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी विविध फुलांच्या लागवडीतून आर्थिक प्रगती साधत आहेत. वाल्हे परिसरातील शेतकरी झेंडू, गुलछडी, जर्मन मोगरा या फुलशेतीला प्राध्यान्य देतात. येथील नवयुवक शेतकरी सागर भुजबळ, किसन पवार यांनी देखील पारंपरिक पिकांना छेद देत मोगरा या फूल पिकांची लागवड केली आहे.
व्यावसायिक फूलशेती
वाल्हे परिसरातील शेतकऱ्याने फूल शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत कळीची तोडणी केली जाते. बाजारपेठेमध्ये मोगरा फुलाला किमान दोन हजार रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. लग्नसराई व तिथीनुसार अजून चांगले बाजारभाव मिळेल, अशी माहिती मोगरा फूल उत्पादक शेतकरी किसन पवार, सागर भुजबळ यांनी दिली.