Bamboo Paradi Pudhari
पुणे

Walhe Bamboo Paradi: घटस्थापनेपूर्वी वाल्ह्यातील बांबूच्या परड्यांना मागणी; हजारो परड्या पुण्याकडे रवाना

बुरूड समाजातील कारागिरांची लगबग अंतिम टप्प्यात; वाढलेल्या कच्च्या मालाच्या खर्चामुळे व्यवसाय परवडेनासा

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: घटस्थापना अवघ्या चार दिवसांवर आल्याने वाल्हे (ता. पुरंदर) येथे बांबूच्या परड्या बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक असलेल्या या परड्या पुण्याच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असल्याने तयार झालेला माल मालवाहतूक वाहनांतून पुण्याकडे रवाना होत आहे.

वाल्हे येथील बुरूड समाजातील कारागीर बांबूपासून विविध वस्तू तयार करून पूर्वापार सुरू असलेला पारंपरिक व्यवसाय जपत उदरनिर्वाह करतात. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून बुरूड समाजातील काही कारागीर कुटुंबासह परड्या बनविण्याच्या कामात गुंतले आहेत. बांबूच्या पाती (पावक) काढून त्यापासून परडी तयार केली जाते.

घटस्थापना जवळ आल्याने तयार झालेल्या परड्या पुणे शहरात पाठवून व्यापाऱ्यांना ठोक भावाने दिल्या जात आहेत. मात्र, पारंपरिक व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि त्यासाठी लागणारा कच्चामाल, वेळ व खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याची खंत कारागीर सुलोचना संतोष सपकाळ यांनी व्यक्त केली.

परडी कारागीर संतोष महादेव सपकाळ म्हणाले, वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय करण्याची आवड असल्याने हे काम सुरू ठेवले आहे. परडीसाठी लागणारा कच्चामाल लोणंद (जि. सातारा) येथून आणला जातो. सध्या बांबूचा भाव वाढला असून, जवळपास सव्वादोन रुपये प्रतिनग आहे. त्यात बांबू वाहतुकीचे गाडीभाडे आणि वस्तू तयार करण्याचा खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. सध्या परडीला ठोक भावाने २५ रुपये मिळतात.

हा मोबदला परवडणारा नसला, तरी पारंपरिक व्यवसाय म्हणून काम सुरू ठेवले आहे. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत हजारो परड्या पुणे शहरात विक्रीसाठी मालवाहतूक वाहनांतून पाठविण्यात आल्याची माहिती परडी कारागीर नरेंद्र सपकाळ, विनोद सपकाळ आदींनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT