Ambajichiwadi Water Shortage Pudhari
पुणे

Walhe Ambajichiwadi Water Shortage: पिण्याच्या पाण्याचा टंचाई प्रश्न; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

तलाव कोरडा पडल्याने नागरिक व जनावरांना पाणीपुरवठा संकट; प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: वाल्हे (ता. पुरंदर) ग््राामपंचायत हद्दीतील पूर्वेकडील अंबाजीचीवाडी येथील तलाव कोरडा पडल्याने परिसरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, सुकलवाडी, गायकवाडीतील परिसरातील विहिरी व कूपनलिकांतील पाण्याची पातळी कमी होत आहे. परिणामी नागरिकांसह जनावरांच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व त्यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

अंबाजीचीवाडी येथील तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण सन 1972 च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेतून करण्यात आले होते. त्या दुष्काळी काळात स्थानिकांनी श्रमदान करून हा तलाव उभारला. खोलीकरणामुळे लाखो लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली. ज्यामुळे पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे पाणी येथे जमा होऊन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असे.

गतवर्षी मुसळधार पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात हा तलाव पूर्णक्षमतेने भरला व ओसंडून वाहिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले; मात्र, यावर्षी पावसाळ्यापूर्वीच तलाव कोरडा पडल्याने परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.

सध्या विहिरी व कूपनलिकांमध्ये अगदी काहीच दिवसांचे पाणी शिल्लक असून, त्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे. यादरम्यान जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. फेबुवारीतच पाणी संपल्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार.
तुकाराम पवार, शेतकरी, अंबाजीचीवाडी
विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने जेमतेम काही दिवसच पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. सगळ्यात मोठा प्रश्न जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा असून, मागील महिन्यांपासून हिरवा चारा मिळवण्याची शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.
भाऊसाहेब पवार, शेतकरी, मुकदमवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT