पुणे: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून २० वर्षीय तरुणीवर मुख्य आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याच्या आणखी तीन मित्रांकडूनही तिच्यावर अत्याचार करण्यास पाठविल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता पीडितेचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध लैगिक, धमकी आणि अन्य गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. फरहान रिझवान शेख (वय २०), फजल शेख (वय २०) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांनाही 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील एक जण अल्पवयीन असून, साहिल दिंडोरे (वय २०, सर्व रा. विमाननगर) याचा पोलिस शोध घेत असून, चौघांवरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीची ओळख मुंढवा परिसरात राहणाऱ्या फरहान रिझवान शेख (वय २०) याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. या नात्याचा गैरफायदा घेत फरहानने लग्नाचे व प्रेमाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२५ ते ३ जून २०२६ या कालावधीत लेक्सिकॉन कॉलेजजवळील सहारा पीजी, रूम क्रमांक १३, वाघोली तसेच खराडी येथील पंचशील टॉवरच्या पाठीमागील ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपी फरहान याने त्याचे मित्र फजल शेख, अल्पवयीन आरोपी आणि साहिल यांनाही पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. या सर्वांनी मिळून पीडितेवर अत्याचार करत त्याचे अश्लील व्हिडीओ चित्रीत केले. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिच्यावर दबाव आणल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
सततचा अत्याचार, धमक्या आणि छळामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर धाडस करून वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपींचे मोबाईल फोन, व्हिडीओ, चॅट, कॉल रेकॉर्ड आणि अन्य डिजिटल पुरावे जप्त करून त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड करत आहेत.