वाघोली : वाघोली ते चऱ्होली हा साडे पाच किलो मीटरचा रिंग रोड तातडीने करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. नगर रोड, सोलापूर रोड, नाशिक रोड, मुंबई रोड ला जाण्यासाठी हा रस्ता होणे गरजेचे आहे.
रिंग रोड मुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. जागा ताब्यात घेण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेत चर्चेसाठी निमंत्रण दिले होते.
या बैठकीसाठी आयुक्त नवल किशोर राम, पथ विभागाचे प्रमुख अनिल अनिरुद्ध पावसकर, बांधकाम विभाग यासह मनपा प्रत्येक विभागाचे अधिकारी, हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोक खांदवे, गणेश खांदवे, सुधीर काळभोर, प्रवीण खांदवे, निलेश खांदवे, युवराज खांदवे, पपू खांदवे, प्रतीक खांदवे आदी स्थानिक जागा मालक उपस्थित होते.
यावेळी अशोक खांदवे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. ते म्हणाले, ६५ मीटर रुंदीचा हा रिंग रोड असून रस्त्याच्या एका बाजूला १२ मीटर तर एका बाजूला २४ मीटर रुंदीचा सर्व्हिस रस्ता करण्यासाठी प्रारूप आराखड्यात आरक्षित करण्यात आला आहे. ६५ मीटर रस्त्यांमध्येच अनेक जणांच्या जमिनी व घरे जाणार असल्याने या दोन्ही सर्व्हिस रस्त्याची काय गरज आहे, सर्व्हिस रस्ता रद्द करावा अशी मागणी केली. ज्या जागा मालकांच्या जमिनी रस्त्यांमध्ये बाधित होणार आहेत त्यांना पाच पट मोबदला द्यावा.
पुन्हा त्यांच्याच जमिनीवर इतरत्र आरक्षण टाकू नये. व जरी टाकले असल्यास ते रद्द करण्यात यावे. पठारे वस्तीवरील ३६ मीटर रुंदीचा रस्ता कमी रुंदीचा करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांची घरे वाचतील. रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या एक दोन गुंठे प्लॉट धारकांना रोख स्वरूपात टीडीआर द्यावा. अशा मागण्या यावेळी आयुक्तांशी झालेल्या चर्चेत अशोक खांदवे यांनी केल्या आहेत. यावेळी आयुक्त नवल किशोर राम यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आहे.