

खुटबाव: दौंड तालुक्यातील यवत येथे नागरिक पुणे-सोलापूर महामार्ग पायी ओलांडत असल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. त्यात काहींना जीव गमवावा लागला आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात टाळण्यासाठी रस्ते विभागाने महामार्गाच्या मध्यभागी अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत सुरक्षा जाळ्या लावल्या आहेत. मात्र, सुरक्षा जाळ्या लावूनही नागरिक जिवाला धोका पत्करून त्यावरून ये-जा करीत आहेत. रस्ते विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल करावा, अशी मागणी होत आहे.
सोलापूर महामार्गाचे विस्तारणीकरण करताना यवत येथे उड्डाणपूल होणे आवश्यक होते. परंतु पूल तसेच मुख्य चौकात भुयारी मार्ग झाला नाही. जिल्हा परिषद शाळेजवळ भुयारी मार्ग करण्यात आला असला तरी तो गैरसोयीचा आहे. मुख्य बाजारपेठेकडे जाण्यासाठी वाहनचालकांना एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भुलेश्वर फाटा येथील चौकातून वळसा घालून यावे लागते.
अनेकजण पायी महामार्ग ओलांडून ये-जा करतात. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तीव उतार असल्याने भरधाव वाहनांमुळे अनेकदा अपघात झाला आहे. अपघात टाळण्यासाठी रस्ते विभागाने महामार्गाच्या मध्यभागी साधारणतः एक किलोमीटर अंतरावर चार फूट उंचीच्या लोखंडी सुरक्षा जाळ्या उभारल्या आहेत. मात्र, सुरक्षा जाळ्या लावूनही नागरिक धोका पत्करून ये-जा करीत आहेत. अनेकजण जाळ्यांवरून पडून गंभीर जखमी झाले आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्ते विभागाने मुख्य चौकात पादचारी पूल उभारावा, अशी मागणी होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गाचे विस्तारीकरण होऊन बारा वर्षे उलटली. यवत गाव हे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वसले आहे. आतापर्यंत महामार्ग ओलांडताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यवत येथे उड्डाणपूल होणे गरजेचा आहे. सध्या रस्ते विभागाने पादचारी पूल करावा.
मोहसीन तांबोळी, अध्यक्ष, पुणे जिल्हा काँग््रेास परिवहन विभाग