विद्यापीठ चौक उड्डाणपूल जानेवारीत सुरु होणार; 75 टक्के काम पूर्ण Pudhari News
पुणे

Pune University Chowk: विद्यापीठ चौक उड्डाणपूल जानेवारीत सुरु होणार; 75 टक्के काम पूर्ण

Latest Pune News: पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार अवघ्या दोन-अडीच महिन्यात सुटका

पुढारी वृत्तसेवा

Pune News: वाहतूक कोंडीसाठी सतत चर्चेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे (Pune) विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी चौकातील वाहतूक समस्येतून पुणेकरांची येत्या वर्षारंभी सुटका होणार आहे. येथे उभारण्यात येणार्‍या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास 75 टक्के पूर्ण झाले असून, उरलेले काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, ही त्यांना नववर्षाची भेटच ठरेल.

पीएमआरडीए प्रशासनाकडून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसह सावित्रीबाई फुले चौकातील दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम मे 2020 नंतर हाती घेण्यात आले. हे काम येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, या कामाचा सातत्याने पाठपुरावा स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे करत आहेत.

उड्डाणपुलाच्या आणि मेट्रोच्या कामामुळे पुणेकर वाहनचालक गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त झाले आहेत. या कोंडीतून कधी सुटका होणार, असा प्रश्न त्यांना कायमच पडलेला असतो. त्यामुळेच शिरोळे यांनी अधिकार्‍यांबरोबर अनेकदा चौकपाहणी करून बैठक घेतली.

परिणामी, या कामाला गती मिळाली आहे. दुमजली उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अखेर विद्यापीठ चौकात होणार्‍या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Pune News)

दुमजली उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

  • उड्डाणपुलाची एकूण लांबी - 1.50 किमी (रॅम्पसह) आणि 1112.52 मीटर, वायाडक्ट लांबी.

  • औंध व बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी प्रत्येकी 2 लेन अप रॅम्पसह उड्डाणपूल.

  • शिवाजीनगरकडून बाणेर व पाषाणकडे जाण्यासाठी 3 लेन उड्डाणपूल व पुढे प्रत्येकी 2 लेन डाऊन रॅम्प असणार आहेत.

  • औंध, बाणेर व पाषाणकडून सेनापती बापट रोडला जाण्यासाठी गणेशखिंड रस्त्यावरून जाण्याची व्यवस्था असणार आहे.

  • मुख्य विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल खांबाचा वाहतुकीस अडथळा होऊ नये, म्हणून या ठिकाणी 55 मी. लांबीचा स्टील गर्डर स्पॅन बसविण्यात येणार आहे.

विद्यापीठ चौकात पालिका करणार ही कामे...

  • शिवाजीनगरकडून औंधकडे जाण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, पुणे ते राजभवनपर्यंत अंडरपास (2 लेन) (680 मी. लांब) असणार आहे.

  • सेनापती बापट रोडवरून बाणेर व पाषाणकडे जाण्यासाठी उड्डाणपुलास 2 लेन रॅम्पद्वारे कनेक्शन असणार आहे.

ही कामे झाली पूर्ण...

  • सेनापती बापट रोडला जाण्यासाठी गणेशखिंड रस्त्यावरून जाण्याची व्यवस्था.

  • उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल डिझाइनचे काम पूर्ण.

  • उड्डाणपूल खांबाच्या ठिकाणच्या सेवा वाहिन्या तपासणे व स्थलांतरित करण्याची कामे पूर्ण.

  • उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष बांधकाम प्रगतीत असून, आजमितीस 356 पाईल, 42 पाईल कॅब, 42 पेअर व 13 पेअर आर्म कनेक्शनचे काम पूर्ण.

  • शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी चौक हा महत्त्वाचा घटक आहे. या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्याची गरज होती. त्यासाठी पीएमआरडीएच्या हिंजवडी-शिवाजीनगर न्यायालय या मार्गावरील मेट्रोचा मार्ग आणि खासगी वाहनांचा उड्डाणपूल यांची एकत्रित सोय करण्याची योजना आखण्यात आली. ही योजना गतीने पूर्ण व्हावी, यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले असून, ते आता यशस्वी ठरत असल्याचा आनंद वाटतो आहे.
- सिद्धार्थ शिरोळे, शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT