Maharashtra Assembly Polls | आजपासून विधानसभेचे उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात

राजकीय वाटाघाटी अंतिम टप्प्यात
Maharashtra Assembly Elections
Maharashtra Assembly Polls |आजपासून विधानसभेचे उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवातfile photo
Published on
Updated on

मुंबई : मंगळवारी २२ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत असतानाच महायुती आणि महाविकास आघाडी या प्रतिस्पर्ध्यांचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून कोणत्याही क्षणी त्यांच्या उमेदवार याद्या जाहीर होऊ शकतात. (Maharashtra Assembly Polls)

शिवसेना, अजित पवार गट आणि भाजप प्रत्येकी किती जागा लढवणार; महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्या वाट्याला प्रत्येकी किती जागा येतील हे कदाचित उमेदवार याद्यांवरूनच स्पष्ट होईल. विदर्भातील काही जागांवरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस संघर्ष अद्याप मिटलेला नाही. हे भांडण विकोपाला जाऊ नये म्हणून काँग्रेसश्रेष्ठींनी महाविकास आघाडीतील समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टाकली असून हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना शह समजला जातो. (Maharashtra Assembly Polls)

आजपासून नामांकन

• उमेदवारी अर्ज भरणे : दि. २२ ते दि. २९ (सकाळी ११ ते दुपारी ३)

• उमेदवारी अर्ज छाननी : दि. ३०

• उमेदवारी अर्ज माघार : दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनपर्यंत

• चिन्ह वाटप : दि. ४ नोव्हेंबर

• मतदान : दि. २० नोव्हेंबर

• मतमोजणी : दि. २३ नोव्हेंबर (सकाळी आठ वाजल्यापासून)

थोरात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची मंगळवारी भेट घेणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेवर शिवसेना ठाकरे गट नाराज असल्याने पक्षाने समन्वयाची जबाबदारी थोरात यांच्याकडे दिल्याचे सांगितले जाते. आधी मविआतील जागावाटप जाहीर करायचे, त्यानंतर उमेदवार यादी जाहीर करायची, ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळेच सोमवारी अपेक्षित असलेली उमेदवार यादी थांबवल्याचे सांगण्यात येते. शिवसेना ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही अद्याप आपली यादी जाहीर केली नाही. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ६३ जागांवर चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. तत्पूर्वी काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत ९६ जागांवर चर्चा झाली होती. २५ ऑक्टोबरला पुन्हा एकदा छाननी समितीची आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. दुसरीकडे भाजपने ९९ जागांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर वेटिंगवर असलेल्या विद्यमान आमदारांसह इच्छुक दावेदारांनी सोमवारी मुंबईत धाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एकच गर्दी केली. त्यामुळे उर्वरित जागांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर या नाराजीच्या लाटा आणखी किती उसळतात हे दोन दिवसांत स्पष्ट होईल.

ठाकरे-भाजप युतीच्या दिवसभर वावड्या

महाविकास आघाडीत बिनसलेच तर उद्धव ठाकरे यांनी प्लॅन बी म्हणून भाजपशी संधान साधल्याची चर्चा सोमवारी बरीच रंगली. सेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची ब्रेकिंग बातमी दाखवली गेली. ब्रेकिंगचा हा पतंग शेवटी राऊत यांनीच काटला. भाजपशी हातमिळवणी करणे म्हणजे औरंगजेबाशी हातमिळवणी करण्यासारखे आहे, अशा शब्दांत त्यांनी या पतंगबाजीची हवा काढली. अशा बातम्या देणे म्हणजे मोठीच सुपारी दिसते, अशा शब्दांत त्यांनी या वावड्यांची संभावना केली. (Maharashtra Assembly Polls)

मनसेला निवडक जागी महायुतीचा पाठिंबा ?

केवळ दोन उमेदवार आतापर्यंत जाहीर करणाऱ्या मनसेला निवडक ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीला पराभूत करता येईल, अशा मतदारसंघांत महायुती बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा पसरली. महायुतीमधून कुणीही या बातमीला दुजोरा दिला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news