Vat Pournima Pudhari
पुणे

Vat Pournima Worship: महात्मा फुले वाड्यातील वटवृक्ष पूजेस हिरवा कंदील; राज्य पुरातत्व विभागाचे निर्देश

वटपौर्णिमेच्या पारंपरिक पूजेस परवानगी देण्याबाबत संवेदनशीलतेने निर्णय घेण्याचे आदेश; फुले विचार आणि परंपरा यावर पुन्हा चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘महात्मा जोतिबा फुले यांच्या गंज पेठेतील वाड्याच्या परिसरातील वटवृक्षाची पूजा महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी करू द्यावी. हा विषय संवेदनशील असल्याने योग्य प्रकारे हाताळून त्याचा अहवाल द्या!’ असे आदेश राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी पुणे येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांना दिले आहेत.

महात्मा फुले यांचे पुरोगामी विचार लक्षात घेत पुरोगामी संघटनांनी या वटवृक्षाची पूजा करू नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे येथील सहाय्यक संचालकांनी या वटवृक्षांची पूजा करण्यास मज्जाव करणारे आदेश काढले होते. त्या विरोधात या परिसरातील काही महिलांसह नागरीकांनी त्या वडाच्या झाडाची पूजा पारंपरिक पद्धतीने करू द्यावी, अशी मागणी संचालकांकडे केली.

यात वर्षा धोंगडे, सखुबाई देवळे, माधुरी बल्लाळ, राखी जाधव, मीना लोखंडे, नारायणी कांबळे यांच्यासह काही महिला तसेच विजय कांबळे, अविनाश देवकुळे यांनी मुंबई येथील राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यावर २३ जून रोजी संचालकांनी हा निर्णय दिला.

डॉ. तेजस गर्गे यांनी दिलेल्या निर्णयातील तपशील

  • महात्मा फुलेवाडा हे राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्यापूर्वी वा नंतर परिसरात सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम किंवा रुढी-परंपरा या बाबत पुरातत्व अधिनियम १९६२ प्रमाणे कोणतीही स्पष्टता नाही.

  • केंद्र शासनाच्या कलम १६ (१) नुसार कोणतेही स्मारक संरक्षित होण्यापूर्वी त्याचे स्वरुप जसे आहे. तेथे ज्या रुढी-परंपरा प्रचलित आहेत, त्या तशाच अबाधित राहाव्या. महात्मा फुलेवाडा हे स्मारक संरक्षित होण्या अगोदरच्या काळापासून चालत आलेल्या परंपरा, चालीरीती यांची सद्यस्थिती कायम ठेवणे, ही आपल्या कार्यालयाची जबाबदारी आहे.

  • सबब,सदर विषय अतिशय संवेदनशील असल्याने महात्मा फुलेवाडा या राज्य संरक्षित स्मारकाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करून कायदा सुव्यवस्था, स्मारकाची स्थिती, परिसराची रम्यता राखण्याकरिता आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करावी. या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनायास तत्काळ सादर करावा.

या भागातील महिला वर्षानुवर्षे वटपौर्णिमेला या वडाची पूजा करतात. त्यामुळे आम्ही संचालकांकडे दाद मागितली होती. त्यांनी आम्हाला न्याय दिला. या निर्णयाचे स्वागत करतो.
विजय कांबळे, अविनाश देवकुळे पुरातत्व विभागाकडे परवानगी मागणारे
प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानुसार वटपौर्णिमा पूजन करण्यास हरकतीचे कारण नाही. पण ज्या महात्मा जोतिबा फुले यांनी सतत अंधश्रद्धा आणि अनिष्ठ रुढींवर प्रहार केला त्यांच्याच वाड्यात वटपौर्णिमा साजरी करण्याचा दुराग्रह कशाला?
नितीन पवार, फुले विचारांचे सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT