

Medha Kulkarni Abhimanyu Pawar Row: पुण्यात सारथी संस्थेच्या वतीने UPSC आणि MPSC परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या कार्यक्रमात आसनव्यवस्थेवरून राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात वाद निर्माण झाला. या घटनेनंतर मेधा कुलकर्णी प्रसारमाध्यमांशी बोलताना भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, त्या कार्यक्रमाला सकारात्मक मनाने गेल्या होत्या. अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार पहिल्या रांगेतील जागा खासदारांसाठी राखीव असल्याचे सांगितल्यामुळे त्या जागेवर बसल्या. मात्र, त्यानंतर आसनव्यवस्थेवरून वाद निर्माण झाला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी आमदार अभिमन्यू पवार यांनाही ती जागा खासदारांसाठी राखीव असल्याची माहिती दिली होती. तरीही या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण झाला.
यानंतर मेधा कुलकर्णींनी गंभीर आरोप करत सांगितले की, "मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं योग्य दिसत नाही," असे वक्तव्य त्यांच्यासमोर करण्यात आले. या वक्तव्यामुळे जातीचा मुद्दा विनाकारण पुढे आणण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
"खुर्च्यांना कधी जात नसते. कार्यक्रमात आसनव्यवस्था प्रोटोकॉलनुसार ठरवली जाते. मग या प्रकरणात जातीचा विषय आणण्याची गरज काय होती?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मेधा कुलकर्णी यांनी यापूर्वीच्या एका प्रसंगाची आठवण करून देताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात ब्राह्मण समाजाशी संवाद साधण्यासाठी अभिमन्यू पवार यांनी स्वतः त्यांना निमंत्रित केले होते. त्या वेळी प्रकृती ठीक नसतानाही त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. "मग आज जातीचा मुद्दा उपस्थित करून नेमके काय साध्य करायचे आहे?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
यावेळी त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. कार्यक्रमानंतर लाउंजमध्ये जाण्यापासूनही आपल्याला रोखण्यात आल्याचा दावा करत, अभिमन्यू पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्याचा आरोप त्यांनी केला. "अभिमन्यू पवार अजूनही मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यासारखे वागत आहेत का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
"'तुम्ही बसलात तर वाद होईल,' या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा?" असा प्रश्न विचारत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, "मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा केली आणि त्यानंतर शांतपणे कार्यक्रमातून बाहेर पडले. मी शपथपूर्वक सांगते की, मी जे बोलत आहे ते सत्य आहे." या संपूर्ण घटनेनंतर कार्यक्रमात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मेधा कुलकर्णी हा कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेल्या.