Pune Crime : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला ३ वर्षांची शिक्षा, जुन्नर न्यायालयाचा निर्णय

Minor Girl Molestation Case : ६ वर्षांच्या लढ्याला यश
Court
CourtPudhari
Published on
Updated on

ओतूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियांना धमक्या देणाऱ्या आरोपीस तब्बल सहा वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर जुन्नरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय यांनी तीन वर्षांच्या साध्या कारावासाची व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

ही घटना ११ जानेवारी २०२० रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घराजवळील पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी गेली असता आरोपी रमेश सखाराम दाभाडे याने पाठीमागून येत तिची छेड काढत तिचा विनयभंग केला होता.

घाबरलेल्या पीडित मुलीने तात्काळ आजोबांना आवाज देऊन बोलावून घेतले. त्यानंतर घडलेला प्रकार समजताच आजोबांनी आरोपीस जाब विचारला असता त्याने उलट शिवीगाळ करत पीडित मुलगी व तिच्या आजोबांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडित मुलीने त्याच दिवशी ओतूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४(अ), ५०४, ५०६ तसेच पोक्सो कायदा २०१२ च्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावे आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे आरोपीचा दोष सिद्ध केला. विशेष न्यायाधीश एस. बी. शेलार यांनी आरोपी रमेश सखाराम दाभाडे यास विविध कलमांनव्ये दोषी धरत ३ वर्षे साधा कारावास, १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.

याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधिक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीरे, कोर्ट पैरवी अधिकारी संतोष घोळवे, अतिरिक्त सरकारी वकील जी. के. खोडे, महिला पोलिस कर्मचारी पूजा औटी व मनिषा ताम्हाणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news