Mango Pudhari
पुणे

Vat Pournima Mango Demand: वटपौर्णिमेला गावरान आंब्याची टंचाई; पुणेकरांचा नीलम-तोतापुरीला वाढता पसंती

लहरी हवामानामुळे गावरान आंब्याचे उत्पादन 70 टक्क्यांनी घटले; अधिक मासामुळे उशिरा आलेल्या वटपौर्णिमेसाठी परराज्यातील आंब्यांवरच भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी पुणेकरांकडून दरवर्षी गावरान आंब्याला विशेष प्राधान्य दिले जाते. मात्र, यंदा लहरी हवामानामुळे गावरान आंब्याच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली. परिणामी, यंदा गावरान आंब्यांचा हंगाम लवकर आटोपला. त्यात अधिक मासामुळे वटपौर्णिमा उशिरा आल्याने यंदा वटपौर्णिमेसाठी गावरान आंबा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, सुवासिनींना पूजेसाठी परराज्यांतील आंब्यांचा आधार असून, यामध्ये नीलम आणि तोतापुरीला सर्वाधिक मागणी आहे.

लहरी हवामानामुळे गावरान आंब्याच्या उत्पादनात 70 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे, गावरान आंब्याने हंगाम लवकर आटोपला आहे. दरम्यान, अधिक महिन्यामुळे वटपौर्णिमा एक महिना उशिराने आली आहे. त्यात मॉन्सून सक्रिय नसतानाही उत्पादन घटल्याने आंबाच नसल्याने पुणेकरांना यंदा पूजेसाठी परराज्यांतील आंब्यांवरच समाधान मानावे लागणार आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात आता कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच उत्तर प्रदेशातील आंब्यांचीच उपलब्धता दिसून येत असून, त्याला चांगली मागणी आहे.

आठवडाभरानंतर 25 ते 30 डागांची आवक

वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वेल्हा भागातून सात ते आठ डझनांच्या 25 ते 30 डागांची आवक झाली. यामध्ये, रायवळ आणि गोटी आंब्याचा समावेश होता. बाजारात त्याच्या किलोला 70 ते 80 रुपये दर मिळाला. यंदा, अतिउष्णतेमुळे मोहोर तसेच छोट्या कळ्यांची मोठ्या प्रमाणात गळ झाली. परिणामी, यंदा हापूसचे दहा टक्के, तर पायरीचे अवघे पाच टक्के उत्पादन राहिले.

त्यामुळे, या आंब्याचा हंगाम पंधरा दिवसांपूर्वीच आटोपला, तर शेवटच्या टप्प्यातील असलेला रायवळ आणि गोटी आंबा घेऊन शेतकरी आले होते. बाजारात गावरान आंबा नसल्याने या आंब्याने एरवीच्या तुलनेत चांगला दर मिळाल्याची माहिती गावरान आंब्याचे व्यापारी यशवंत कोंडे यांनी दिली.

शुक्रवारी (दि. २६) कर्नाटक हापूसच्या ४ डझनांच्या २०० पेट्यांची आवक झाली. कच्च्या मालाच्या पेटीस दर्जानुसार २००० ते २४०० रुपये भाव मिळाला. हवामानबदलामुळे यंदा कर्नाटक हापूसचा हंगाम विलंबाने म्हणजे २५ एप्रिलपासून सुरू झाला. पाऊस लांबल्याने तो लांबला. दरवर्षी १० जूनपर्यंत होणारी आवक यंदा २६ जूनपर्यंत झाली. शुक्रवारी झालेली ही आवक शेवटची आहे. हा माल वटपौर्णिमेपर्यंत विक्रीस राहील. बाजारात आंध्र प्रदेशातील लालबाग, बदाम, तोतापुरी आणि नीलम आंबा उपलब्ध आहे.
रोहन उसरळ, आंब्याचे व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT