वाफगाव: खेड तालुक्यातील वाफगाव येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातून अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या मोटारींवर लघु पाटबंधारे विभाग व महावितरण विभागाच्या संयुक्त कारवाईत जप्ती करण्यात आली. या कारवाईमुळे लाभधारक शेतकरी व ग््राामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
तलावातून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे पाणी उपसा सुरू असल्याने लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नव्हते. उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी व ग््राामस्थांनी याबाबत पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने बुधवारी (दि. 10) ग््राामस्थांनी चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. या प्रश्नावर दै. ‘पुढारी’ने देखील सातत्याने वृत्तांकन करून शेतकरी व ग््राामस्थांची भूमिका मांडली होती.
अधीक्षक अभियंता, पुणे मंडल यांनी तलावातील अनधिकृत पाणी उपसा तातडीने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर पाटबंधारे विभाग व महावितरण विभागाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या मोटारी, पाइप जप्त करण्यात आले असून संबंधित वीजजोडण्या तोडण्यात आल्या.
या कारवाईच्या वेळी पाटबंधारे व महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, मुक्ताई पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सुर्वे, माजी उपसरपंच अजय भागवत, संचालक गणपत लंगोटे, संजय लंगोटे व अन्य संचालक उपस्थित होते.
...अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल
तलावातून विनापरवानगी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने जवळपास 80 टक्के पाणी थेट जलाशयातून उपसले जात होते, तर कालव्याद्वारे वितरणासाठी केवळ 20 टक्के पाणी शिल्लक राहत होते. मृत पाणीसाठ्याचाही उपसा होत असल्याने कालव्याखालील शेतकऱ्यांना तसेच उन्हाळ्यात माणसे व जनावरांसाठी पाणी उपलब्ध राहत नव्हते. अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांनी तातडीने अधिकृत परवानगी घेऊन संस्थेला सहकार्य करावे, अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुक्ताई पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सुर्वे यांनी दिला आहे. या कारवाईचे वाफगाव परिसरातील शेतकरी व ग््राामस्थांनी स्वागत केले आहे.