Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2026
कोरेगाव भीमा: स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची ३३७ वी पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) व तुळापूर (ता.हवेली) येथे शंभू राजेंना अभिवादन करून शंभू राजेंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सकाळी पहाटे पासूनच शंभू भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. तर सकाळी १० नंतर शंभू भक्तांच्या अलोट महासागरात प्रचंड वाढ होत गेल्याचे पाहण्यास मिळाले.
उपस्थित शंभू भक्तांसाठी वाहन पार्किंग व्यवस्था, शौचालय सुविधा, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष, विसाव्या साठी प्रशस्त मंडप, आरोग्य कक्ष सीसीटीव्ही कॅमेरे, जेवण, पिण्याचे पाणी, थंड पेय सह आवश्यक मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.
श्री क्षेत्र तुळापूर येथील कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती, श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने तर श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा मंच तसेच वढू बुद्रुक ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.
सकाळी ५ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज व कवी कलश समाधींचा महाअभिषेक करण्यात आला. मूक पदयात्रा नंतर ८ वाजुन ३० मिनिटांनी जिल्हाधिकारी राजेंद्र डूडी व पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली.९ वाजता ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हजारो शंभू भक्तांनी हजेरी लावली असल्याचे पाहण्यास मिळाले.दुपारी १२ वाजता प्रतिज्ञा व वेध मंत्रोच्चार तसेच गृह विभाग मानवंदना,माजी सैनिक मानवंदना व शस्त्रास्त्र शास्त्रपारंगत मानवंदना संपन्न झाली.या वेळी आकाशातून हेलिकॉप्टर द्वारे शंभू महाराजांच्या समाधी स्थळावर पुष्पवृष्टी करण्यात आली.दरम्यान १२ वा.३० मिनिटांनी धर्मसभेस सुरुवात झाली.
शंभू चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी लावली हजेरी.......
सकाळी ७ वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ,शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके तसेच शंभूराजेंचे वंशज वृषालीराजे भोसले यांनी शंभूराजांना अभिवादन करून शंभू चरणी नतमस्तक झाले.