माऊली शिंदे
वडगाव शेरी: वडगाव शेरी- कल्याणीनगर प्रभाग 5 मध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेची वाढलेली ताकद, गावकऱ्यांसह इतरांना सोबत घेण्यात आलेले यश, विकासकामे यामुळे वडगाव शेरीमध्ये भाजपने चार नगरसेवक निवडून आणले. नगरसेवक योगेश मुळीक तिसऱ्यांदा या प्रभागातून निवडून आले. भाजपने पक्षातील जुन्या नगरसेवकांना डावलून, नवीन कार्यकत्यांना संधी दिली होती. भाजपचे उमेदवार देऊन निवडून आणण्यात माजी आमदार जगदीश मुळीक यशस्वी ठरले.
गेल्या 12 वर्षांत वडगाव शेरीमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. कार्यकर्त्यांची संख्या इतर पक्षांपेक्षा जास्त आहे. त्याचा फायदा भाजपला प्रत्येक निवडणुकीत होतो. भाजपने 2026 च्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक संदीप जऱ्हाड आणि नगरसेविका सुनीता गलांडे यांना उमेदवारी दिली नाही. नगरसेविका कै. शीतल शिंदे यांचे निधन झाल्याने त्यांचे पती माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे उमेदवारी मागत होते. परंतु, ऐनवेळी राष्ट्रवादीचे नारायण गलांडे यांचा पक्षप्रवेश केला. योगेश मुळीक, नारायण गलांडे, कविता गलांडे आणि श्वेता गलांडे यांना भाजपने उमेदवारी दिली.
भाजपने जुन्या नगरसेवकांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना संधी दिल्याने माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यावर टीका झाली होती. तीन गलांडे उमेदवार दिल्याने भाजपचा पॅनेल पडेल, अशी चर्चा होती. पण, तरी जगदीश मुळीक हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. भाजपची वाढलेली ताकद, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी भाजपला दिलेली साथ, मुस्लिमसह इतर समाजाने भाजपला केलेली मदत.
निवडून येण्यासाठी केलेली अनुकूल प्रभागरचना, वडगाव शेरीतील गावकऱ्यांना आणि इतरांना एकत्र आणण्यात आलेले यश, यामुळे भाजपचा सहज विजय झाला. राष्ट्रवादीची चर्चा खूप झाली. राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची कामे चांगली होती. पण, तेवढ्या प्रमाणात मतदान झाले नाही. सचिन भगत यांचा निवडणुकीत अपेक्षित असा प्रभाव पडला नाही. ॲड. सतीश मुळीक यांनी उज्जैन यात्रा काढली. या यात्रेचा जास्त फायदा झाला नाही. शिवसेनेचे पॅनेल नसल्याने सारिका दळवी यांची लढत एकतर्फी ठरली.
... यांच्यात झाली लढत
या प्रभागात भाजपचे योगेश मुळीक, नारायण गलांडे, कविता गलांडे, श्वेता गलांडे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे संदीप जऱ्हाड, सुनीता गलांडे, रूपाली गलांडे, सचिन भगत तसेच महाविकास आघाडीचे राजेंद्र शिरसाट, सविता राऊत, ॲड. सतीश मुळीक आणि शिवसेनेतून सारिका दळवी अशी लढत झाली.