

राजगुरुनगर: चांडोली, ता.खेड येथील टोलनाकाजवळ दोन अज्ञात इसमांकडून महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावले. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी हे गंठण हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि १२) पुणे- नाशिक महामार्गावरील चांडोली टोलनाकाच्या जवळ कांदा-लसूण केंद्रासमोरील सर्व्हिस रोडवर घडली.
ज्योती राजकुमार उबाळे , ५२, गृहिणी, रा. चांडोली टोलनाका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांच्या मैत्रीण कांचन ओव्हाळ या राजगुरुनगर येथून बाजार करून स्कूटीवर चांडोलीकडे परतत होत्या. त्यावेळी मागून एक लाल रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर दोन इसम आले. गाडी चालवणारा इसम अंगाने मजबूत, काळासावळा, निळसर रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातलेला होता. मागे बसलेला इसम सावळ्या रंगाचा, पांढऱ्या पट्ट्यांचा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेला होता. जेव्हा ते स्कूटीच्या शेजारीून पुढे गेले, तेव्हा मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने धरून हिसका मारून तोडून घेतले.
त्यानंतर दोघेही लाल स्प्लेंडर मोटारसायकलवरून (क्रमांक माहित नाही) पुणेच्या दिशेने पळून गेले. दोन पदरी अडीच तोळे वजनाचे आणि सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा हा गंठण होता.पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांमध्ये सावध राहून, एकटे फिरताना काळजी घ्यावी आणि संशयास्पद व्यक्ती/वाहनांची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी केले आहे.