

पुणे: ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून प्रेमवीरांमध्ये होत असलेली गुलाबाची देवाण-घेवाण आजही तितकीच लोकप्रिय आहे. हे मार्केटयार्डात होत असलेल्या मागणीवरून दिसून येत आहे. सात दिवसांत येथील फुल बाजारात 36670 गड्ड्यांची आवक होऊन 7 लाख 33400 हून अधिक डच गुलाबांची विक्री झाली. घाऊक बाजारात 20 फुलांच्या गड्डीस वीकमधील सर्वाधिक 450 रुपये भाव मिळाला.
सोशल मीडियाच्या जमान्यात फोटो तसेच व्हिडीओद्वारे प्रेम व्यक्त करण्याच्या भावना दृढ होत असतानाच, गुलाबाची देवाण-घेवाण करून प्रेम व्यक्त करण्यास आजही प्रेमवीर आवर्जून प्राधान्य देतात. व्हॅलेंटाईन डे सुरू झाल्यापासून बाजारात लाल डच व साध्या गुलाबांची आवक वाढली असल्याचे सांगून फूलबाजार आडते असोसिएशचे अध्यक्ष अरुण वीर म्हणाले, जिल्ह्यात पॉलीहाऊसमध्ये उत्पादित होणाऱ्या गडद लाल रंगाच्या फुलांना विदेशातही मागणी असते. यामुळे निर्यात संपल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत फुलांचा पुरवठा सुरू होतो.
सध्या बाजारात 50 सें.मी., 70 सें.मी. तसेच 40 सें.मी. लांबीची डच गुलाबांची फुले दाखल होत आहेत. त्याच्या वीस फुलांच्या गड्डीला 200 ते 450 रुपये दर मिळत आहे. लाल गुलाबाच्या पुष्पगुच्छात वापरली जाणारी टॅटसची फुले बाजारात दाखल होत आहे. मंगळवारी सातशे ते आठशे टॅटस फुलांच्या गड्डींची बाजारात आवक झाली. त्याच्या प्रत्येक गड्डीला 20 ते 30 रुपये भाव मिळाला. दरम्यान, ही फुले शहरासह गोवा, दिल्ली, हैदराबाद, प. बंगालला पार्सल स्वरूपात जात असल्याचेही वीर यांनी नमूद केले.
यंदा डच गुलाबाला अपेक्षेपेक्षा अधिक चांगली मागणी मिळाली आहे. रोझ डेपासूनच बाजारातील वातावरण उत्साहपूर्ण होते. फुलांना चांगले दर मिळाल्याने उत्पादक आणि व्यापारी दोघांनाही दिलासा मिळाला आहे. यंदा लाल डच गुलाबाबरोबरच पांढऱ्या गुलाबालाही चांगली मागणी दिसून आली. अनेकांनी पुष्पगुच्छांसाठी तसेच खास सजावटीसाठी पांढऱ्या गुलाबाची निवड केली. परराज्यांतील मागणी आता हळूहळू कमी होत असली तरी शहरातील स्थानिक मागणी अजूनही टिकून आहे. पुढील दोन दिवस किरकोळ बाजारात विक्री चांगली राहील.
सागर भोसले, फुलांचे व्यापारी व समन्वय, अडते असोसिएशन
मागील सात दिवसांत बाजारात दररोज 4 हजार 500 च्या आसपास डच गुलाबाच्या गड्ड्यांची आवक झाली. रोझ डेच्या आदल्या दिवशी ही आवक सहा हजारांपार गेली होती. त्यानंतर, गुरुवारी आवक सात हजारांपार गेली. शुक्रवारी ही आवक व विक्री वाढण्याचा अंदाज आहे. मागील आठ दिवसांत बाजारात डच गुलाबामध्ये तब्बल 1 कोटी 28 लाख 18 हजारांची उलाढाल झाली आहे.
संतोष कुंभारकर, विभागप्रमुख, फूलबाजार, गुलटेकडी, मार्केटयार्ड