उरुळी कांचन: पुणे ग््राामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलिस यांना सासुरवास झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सासू, पतीसह सासरच्या 6 जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीचा गुन्हा उरुळी कांचन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
प्रियंका शिवकुमार खबाले (वय 25, रा. सध्या रा. शिंदवणे, ता. हवेली मूळ रा. रांझणी, ता. माढा, जि. सोलापूर) असे छळ झालेल्या महिला अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी खबाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती शिवकुमार श्यामराव खबाले, सासू शोभा शामराव खबाले, सासरे श्यामराव खबाले, नणंद लक्ष्मी खबाले, दीर अमर खबाले, दीर मंगेश खबाले, (सर्व रा. बसस्थानकाजवळ कळंब, ता. कळंब, जि. धाराशिव) या सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रियंका यांचा विवाह डिसेंबर 2021 मध्ये कळंब (जि. धाराशिव) येथील शिवकुमार खबाले यांच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी प्रियंका यांच्या कुटुंबीयांनी 5 तोळे सोने, 4 लाख रोख आणि 5 लाखांचे प्रापंचिक साहित्य दिले होते. लग्नानंतर काही महिने सुखात गेल्यानंतर प्रियंका आजारी पडल्या असता, सासरच्यांनी त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले. ’तुझ्या आई-वडिलांकडे जाऊन उपचार कर,’ असे म्हणत त्यांना माहेरी पाठवून दिले.
प्रियंका यांनी पुढील शिक्षणासाठी संगणक क्लास लावल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना घरात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. क्लासला जाऊ नये म्हणून त्यांना घरातील कामाचा जादा बोजा दिला जात होता. तरीही प्रियंका यांनी पोलिस भरतीची तयारी सुरू केली. त्यांनी पोलिस भरतीची ॲकॅडमी लावली असता, त्यांच्या पतीने दारू पिऊन तिथे येत ’भरती झालीस तर तुला नांदवणार नाही,’ अशी धमकी दिली होती.
प्रियंका 29 मे 2023 रोजी पोलिस दलात भरती झाल्या. ट्रेनिंग पूर्ण करून कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर देखील सासरच्यांकडून त्यांचा छळ सुरूच होता. प्रियंका त्यांच्या पगारातून घरातील खर्च चालवत होत्या, तरीही पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण केली. ’तुझ्यासारख्या स्त्रीला आमच्या घरात जागा नाही,’ असे म्हणत डिसेंबर 2025 मध्ये त्यांना घराबाहेर काढले.
सध्या प्रियंका या शिंदवणे येथे भाड्याच्या खोलीत एकट्याच राहत आहेत. तिथे आल्यावरही पतीने दोन ते तीन वेळा येऊन त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. सासरच्या लोकांच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर प्रियंका यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.