Mining Pudhari
पुणे

Illegal Murum Mining: अवैध मुरुम उत्खननाचा कहर; उरुळी कांचनमध्ये अपघातात तरुणाचा मृत्यू

नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या तस्करीमुळे रस्ते धोकादायक; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन: हवेली तालुक्यात अवैधरीत्या मुरुम उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग परिसरात दिवसाढवळ्या, तसेच रात्री-अपरात्री डंपरच्या माध्यमातून मुरुमाची तस्करी होते. सोरतापवाडी येथे शुक्रवारी (दि. 3) अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघाताने अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पूर्व हवेली परिसरात डोंगर पोखरून, तसेच गायरान जमिनीवरील मुरुमाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे. या मुरुमाची वाहतूक कोणत्याही परवानगीशिवाय व नियमांची पायमल्ली करून केली जाते. महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने हा व्यवसाय जोमात सुरू असल्याचा आरोप होत आहे.

या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे सेवा रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्‌‍यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे अवैध मुरुम उत्खनन व वाहतूक तत्काळ थांबवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, तसेच रस्ते सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाहतुकीच्या नियमांकडे पूर्ण दुर्लक्ष

अवैध मुरुम वाहतूक करताना अनेक गंभीर नियमांचे उल्लंघन होत आहे. ओव्हरलोड डंपर, बेदरकार वेग, चालकांचे निष्काळजी वाहन चालवणे, क्लिनर नसणे, तसेच काही ठिकाणी व्यसनाधीन अवस्थेत वाहन चालविण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे रस्ते सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

या भागात सुरू असलेल्या अवैध उत्खनन व वाहतुकीकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अशा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक शंका उपस्थित करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT