उरुळी कांचन: भर उन्हाळ्यात वीज, पाणी व खते मिळत नसल्यासह पक्षाकडून सार्वजनिक विकास व वैयक्तिक स्वरूपाची नागरिकांची कामे होत नसल्याने सत्ताधारी असूनही प्रशासनव्यवस्थेत काडीचे स्थान मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शिंदवणे (ता. हवेली) येथील भाजप कार्यकर्त्यांसह तालुका पदाधिकारी गुरुनाथ मचाले यांनी पक्षाचा थेट राजीनामा देण्याचा इशारा जिल्हा व तालुका नेतृत्वाला दिला आहे.
कडक उन्हाळ्यामुळे शेतीला पाण्याची गरज असताना पाणी मिळत नाही. मुळा-मुठा कालव्याभोवतालच्या गावांना मुबलक वीजपुरवठा होत नाही, प्रशासनाला निवेदन देऊनही सत्ताधारी पक्षाचे असूनही प्रशासन दखल घेत नाही खते, बियाणे मिळण्यासह खडकवासला पाणी वाटप नि?ोजनात शेतकऱ्यांना दाद न देणे, कालव्याला पाणी असूनही पाण्याला अटकाव करणे तसेच वीज रोहित्रे बदलण्याची मागणी करूनही महावितरणकडून दाद न देणे अशा पद्धतीची वागणूक प्रशासनाकडून मिळत आहे. सत्ताधारी भाजप पक्षामध्ये कार्यरत असूनही जनतेची कामे मार्गी लावता येत नसल्याने भाजपचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत.
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी रस्ते, पाणंद रस्ते, साकव व इतर विकास निधीसाठी मागणी करूनही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सहकार्य मिळत नसल्याने पदाधिकारी संतप्त आहेत. याउलट राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तालुक्याचे आमदार ज्ञानेश्वर कटके हे पूर्ण ताकद देऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहत असल्याने त्यांच्या छोट्याशाही कामांना पाठबळ मिळत आहे. सत्ताधारी असूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य मिळत नसल्याने भाजपचे काम करून काय उपयोग? असा उद्विग्न सवाल या भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. पदाधिकारी असून, लोकांची कामे मार्गी लागत नसल्याने कार्यकर्ते नेतृत्वावर नाराज असल्याची भावना पदाधिकारी बोलून दाखवत आहेत.
विजेच्या त्रासाला शेतकरी कंटाळले असताना साधे रोहित्र बदलून देण्याच्या मागणीवर महावितरण निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत असतील, तर प्रश्न कसे सोडणार? हा मोठा प्रश्न आहे. कालव्यातील पाणी उचलण्यास पायबंद, विजेचा पुरवठा न मिळणे व जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळत नसल्याने पक्षाच्या भवितव्याच्या विचार करण्यापेक्षा राजीनामा योग्य, असा सूर या पदाधिकाऱ्यांत आहे.
केंद्र व राज्यात सत्ता असल्याने भाजपचे जिल्ह्यात पदाधिकारी मात्र जोमात आहेत. हे वरिष्ठ मंडळी पक्षप्रचाराचा पूर्ण अजेंडा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर लादत आहेत. ममन की बातफ, सभासद नोंदणी, बूथ बैठक तसेच विविध कार्यक्रम या पदाधिकाऱ्यांकडून करवून घेतले जात आहेत. मात्र, गावात काम करण्याची पदाधिकाऱ्यांवर वेळ आली तर काम हे वरिष्ठ मार्गी लावत नाही. चमकोगिरी करणाऱ्यांना प्राधान्य; मात्र सामान्य पाठीमागे, अशा पध्दतीने भाजपात भीक नको; पण कुत्रं आवर अशी अवस्था असल्याचे पदाधिकारी बोलत आहेत.