UPSC Pudhari
पुणे

UPSC Mains Result 2026: UPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर! १३,३४३ पैकी २,५२६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र

केवळ १८.९३ टक्के उमेदवारांना पुढील टप्प्याची संधी; २५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज अपडेट करणे अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या एकूण १३ हजार ३४३ उमेदवारांपैकी २ हजार ५२६ जणांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच व्यक्तिगत चाचणी किंवा मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. मुख्य परीक्षेत बसलेल्या उमेदवारांपैकी सुमारे १८.९३ टक्के उमेदवारच या टप्प्यात पोहचू शकले आहेत.

पाच उमेदवारांमागे एका उमेदवाराला मुलाखतीची संधी मिळाली आहे. यशस्वी उमेदवार आता भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा तसेच इतर केंद्रीय सेवांच्या ग्रुप ए आणि ग्रुप बी पदांसाठीच्या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. पात्र ठरलेल्या उमेदवारांसमोर आता दोन महत्त्वाची कामे आहेत. एक म्हणजे मुलाखतीची तयारी आणि दुसरे म्हणजे ऑनलाइन अर्जात आवश्यक माहिती भरणे किंवा अपडेट करणे.

यासाठी आयोगाने दि. ११ ते २५ नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली आहे. ही प्रक्रिया सर्व यशस्वी उमेदवारांसाठी अनिवार्य आहे. यूपीएससी परीक्षेत मुलाखत हा निवड प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यंदा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १३ हजार ३४३ उमेदवारांनी लेखी मुख्य परीक्षेत स्थान मिळवले होते.

आता त्यापैकी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीत आपली योग्यता सिद्ध करावी लागेल. मुलाखतीच्या तारखांची घोषणा आयोगाकडून स्वतंत्रपणे केली जाईल. उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल तपासून पाहावा. निकालाच्या यादीत मुलाखतीसाठी निवड झालेल्यांची नावे आणि रोल नंबर देण्यात आले आहेत.

उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरावी...

ज्या उमेदवारांनी आधीच कागदपत्रे आणि माहिती अपलोड केली आहे. त्यांनाही पोर्टलवर जाऊन फॉर्म सबमिट करावा लागेल. असे न केल्यास त्यांचे मुलाखतीचे प्रवेशपत्र जारी केले जाणार नाही. पूर्वपरीक्षेच्या अर्जात शैक्षणिक पात्रता 'अपियरिंग' दर्शविलेल्या उमेदवारांना आता उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल. संबंधित माहिती अपडेट करून कागदपत्रे अपलोड करावी लागतील; अन्यथा उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास मुलाखतीसाठी प्रवेश मिळणार नाही. उमेदवारांनी वेळेवर पोर्टल वापरून सर्व माहिती अचूक भरावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या वर्षी मुख्य परीक्षेतून मुलाखतीपर्यंत पोहचण्याचे उमेदवारांचे प्रमाण कमी राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT