बिबवेवाडी: अप्पर बिबवेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांची दुरवस्था, अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे ढीग, वाहतूक कोंडी आणि पथदिव्यांच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यातच मंगळवारी दुपारी अप्पर डेपो परिसरात अचानक रस्ता खचल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
अप्पर डेपो परिसरातील या रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी करण्यात आले होते. त्यानंतर अल्पावधीतच रस्ता खचल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित कामाची आणि तत्कालीन महापालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी काही भागांत अपुरा प्रकाश असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शेळकेवस्ती परिसरातील रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने काही भागातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या समस्यांबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून कर वसूल करणारे महापालिका प्रशासन परिसरातील विविध समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
लोकप्रतिनिधींना आश्वासनांचा विसर?
निवडून आलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या काळात मतांसाठी नागरिकांना विविध आश्वासने दिली होती. मात्र, आता त्यांना या आश्वासनाचा विसर पडूला असून, परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष देण्यासाठी सध्या त्यांना वेळ नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
दाद मागायची तरी कोणाकडे?
नागरी प्रश्नांबाबत महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेला नियमित कर देणाऱ्या आणि निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या प्रश्नांसाठी दाद मागायची तरी कोणाकडे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अप्पर बिबवेवाडीतील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि वाहतूक यांसह विविध नागरी प्रश्न तातडीने सोडवावेत; अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.अमोल परदेशी, सामाजिक कार्यकर्ते