Ujani Dam Pudhari
पुणे

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणार; 7 टीएमसी पाणी राखीव

पिण्याच्या योजनांना दिलासा, पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर: उजनी धरणातून भीमा नदीमध्ये शनिवार (दि. 18) पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनीतून भीमा नदीमध्ये एकूण 2 वेळा पाणी सोडण्यासाठी 7 टीएमसी पाणी राखून ठेवण्याचा निर्णय देखील गुरुवारी (दि. 16) सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या बैठकीनंतर गुरुवारी दिली.

भीमा नदीकाठावरील गावांमधील व नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी शनिवारपासून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

सध्याची परिस्थिती पाहता पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन देखील हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे समवेत झालेल्या ऑनलाईन बैठकीला हर्षवर्धन पाटील यांच्यासह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच सोलापूर जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उजनी धरणामध्ये सध्या 80 टीएमसी पाणी शिल्लक असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टीएमसी पाणी जास्त आहे. शनिवारी भीमा नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर पुन्हा जून महिन्यात दुसरे आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समवेत मे महिन्यात बैठक होऊन निर्णय घेतला जाईल, असे या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नमूद केल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

योजनांना पाणी कमी पडू देऊ नये

उजनी पाणलोट क्षेत्रातील प्रकल्पग््रास्त शेतकऱ्यांना पाण्याचा कोटा दिलेला आहे. त्यानुसार त्यांना पावसाळ्यापर्यंत पाणी पुरले पाहिजे, तसेच उजनी पाणलोट क्षेत्रातील गावांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाणी योजनांना देखील पाणी कमी पडू देऊ नये, अशी बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT