

पुणे: वाढत्या महागाईच्या काळात नवीन वाहन खरेदी करण्याऐवजी पुणेकर आपल्या जुन्याच वाहनांना पसंती देत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नुकतीच मागील आर्थिक वर्षाची (सन 2025-26) आकडेवारी जाहीर केली असून, यामध्ये तब्बल 44 हजार 800 जुन्या वाहनांची पुनर्नेांदणी (रि-रजिस्ट्रेशन) करण्यात आली आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत ही विक्रमी पुनर्नोंदणी झाली आहे.
वाहनांची नोंदणी असते 15 वर्षांसाठी वैध
नियमनानुसार, खासगी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी 15 वर्षांसाठी वैध असते. त्यानंतर, प्रत्येक 5 वर्षांनी वाहनाची योग्यता तपासून त्याचे नूतनीकरण करणे अनिवार्य असते.
पुणे आरटीओमध्ये गेल्या वर्षभरात
एकूण पुनर्नोंदणी :- 44,800 वाहने
कालावधी :- 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026
फिटनेस चाचणीकडे विशेष लक्ष
जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आरटीओ प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. ज्या वाहनांची 15 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांची फिटनेस टेस्ट अत्यंत काटेकोरपणे घेतली जात आहे. इंजिनची क्षमता, बेक, लाइट आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्सर्जन मानके पूर्ण करणाऱ्या वाहनांनाच पुढील पाच वर्षांसाठी रस्त्यावर धावण्याची परवानगी दिली जात आहे.
जुन्या वाहनांच्या वापराबाबत...
पुनर्नोंदणी करताना सरकारला ठराविक ग््राीन टॅक्स (पर्यावरण कर) भरणे बंधनकारक आहे.
नोंदणी संपल्यानंतरही वाहन वापरल्यास दरमहा दंड आकारला जातो.
जर वाहन फिटनेस टेस्टमध्ये नापास झाले, तर ते स्क्रॅप करणे हाच एकमेव पर्याय उरतो. वाहन स्क्रॅप केल्यास त्या व्यक्तीला नवीन वाहन खरेदी करताना 15 टक्के सवलत मिळते.
पुणे आरटीओमध्ये गेल्या वर्षभरात 44 हजार 800 वाहनांची पुनर्नोंदणी करण्यात आली आहे. आमचा मुख्य उद्देश हा आहे की, रस्त्यावर धावणारे प्रत्येक जुने वाहन हे तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की, फक्त नोंदणीचे नूतनीकरण करून थांबू नका, तर आपल्या जुन्या वाहनांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करा आणि पर्यावरण रक्षणासाठी वाहनाची वेळेत पीयूसी बनवून नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे