Ujani Dam Water Pollution Pudhari
पुणे

Ujani Dam Pollution: ‘उजनी’ मृत्यूपंथाला? वाढते प्रदूषण आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

टीडीएस 700 वर; जैवसाखळी कोलमडली, मानवी आरोग्य व शेतीही धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

भरत मल्लाव

भिगवण: वाढत्या प्रदूषणामुळे ‌‘उजनी‌’ जलाशय काळवंडला आहे. त्यामुळे या जलाशयाचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ‌‘उजनी‌’ धाय मोकलून रडत आहे, तो आता आजारी पडला आहे. अखेरच्या घटका मोजत आहे. तरीही सरकार व प्रदूषण मंडळाचे ‌‘उजनी‌’कडे दुर्लक्ष आहे. परिणामी, आता ‌‘उजनी‌’ला मृत घोषित करण्याची वेळ आल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.

गेल्या 20-25 वर्षांपासून ‌‘उजनी‌’तील प्रदूषणाची चर्चा केवळ चघळली जात आहे. राज्य, देशासह अगदी परदेशातील आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ, शास्त्रज्ञांनी देखील ‌‘उजनी‌’च्या प्रदूषित पाण्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, पाणी वापरण्यायोग्य राहिले नसल्याचे सांगत आले आहेत. त्यामुळे ‌‘उजनी‌’च्या प्रदूषणाला अजून किती दाखले द्यायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‌‘उजनी‌’च्या प्रदूषणाने जलाशयातील पानवनस्पती नामशेष झाल्या आहेत. शंख, शिंपले, खेकडे यांसह लहान जीवजंतू नष्ट होऊन जैविक साखळी गळून पडली आहे. देशी माशांच्या प्रजाती अखेरच्या घटका मोजत आहेत. आता फक्त बाकी आहे ते रोगराईचे महासंकट आणि त्यातून होणारी नैसर्गिक हानी. हे जीवन-मरणाचे संकट हाताबाहेर गेल्यानंतरच सरकार व प्रदूषण मंडळ जागे होणार का? असा संतप्त प्रश्न ‌‘उजनी‌’च्या वाढत्या प्रदूषणाकडे पाहून निर्माण झाला आहे.

‌‘उजनी‌’तील प्रदूषण वाढल्यानंतर 2000 ते 2005 मध्ये राज्यातील जलतज्ज्ञांनी भेटी देऊन धोके सांगितले. जलदिंड्या काढल्या. जागृती केली, पण हे सर्व प्रयत्न तोकडे पडले. त्यानंतर जपान, अमेरिका आदी देशांतील आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञांनी भेटी दिल्या. त्यांनी उजनीचे पाणी वापरण्यासही घातक असल्याचे स्पष्ट केले. पुणे व सोलापूर जिल्ह्यातील जलतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते देखील वर्षानुवर्षे आवाज उठवत आहेत. मात्र, यात तसूभरही फरक पडायला तयार नाही, उलट प्रदूषणात वाढच होत चालली आहे.

उजनीतील मकाळे सोनेफ अर्थात वाळू किती आहे, हे मेरी संस्था व आजी-माजी सरकारला दिसले. परिसरात विविध प्रकल्प राबविण्यासाठी उजनी दिसते. पाणी वापरासाठी संघर्ष कळतो, पण सरकारला त्यातील प्रदूषण का दिसत नाही? उजनीतील प्रदूषणामुळे नैसर्गिक अधिवासासह मानवी आरोग्यही धोक्यात आल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. तरीही प्रशासन, प्रदूषण मंडळ आणि इतर संस्था उजनीबाबत ढिम्म भूमिका का घेतात? प्रश्न उपस्थित होत आहे.

तीन जिल्ह्यांतील नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

‌‘उजनी‌’च्या भोवतालच्या पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधींचा राज्यातील राजकारणावर दबदबा आहे. अगदी देशपातळीवरील नेत्यांचा राबता आहे. मात्र, तरीही ‌‘उजनी‌’चे प्रदूषण व त्यावर उपाययोजनांबाबत मबफ निघत नाही. यातून या जिल्ह्यातील नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ‌‘उजनी‌’ची अवस्था पाहून परिसरातील नागरिकांवर ‌‘राम तेरी गंगा मैली हो गयी... पापियों के पाप धोते धोते...‌’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

पाण्याचा ‌‘टीडीएस‌’ 700 वर

जानेवारी 2026 मध्ये भारतातील सर्वांत मोठ्या बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या पाणी तपासणीत देखील धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. यामध्ये पाण्याचा टीडीएस 700 वर पोहचला. इतर घटकांनी धोक्याची पातळी गाठली असल्याचे पुढे आले आहे. यातून उरल्यासुरल्या जलचारांसाठी तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊन त्यांचा अधिवास धोक्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

2000 सालानंतर ‌‘उजनी‌’ला ग््राहण

‌‘उजनी‌’च्या निर्मितीनंतर उजनीचे पाणी स्वच्छ, नितळ होते. जैविक साखळी अबाधित होती. पुनर्वसित गावे थेट पिण्यासाठी या पाण्याचा वापर करीत होती. मात्र, 2000 सालापासून ‌‘उजनी‌’च्या पाण्याला प्रदूषणाचे ग््राहण लागले ते काही केल्याने सुटायला तयार नाही. पिंपरी-चिंचवड औद्योगिकीकरणाचे रासायनिक प्रक्रिया न केलेले पाणी, पुणे शहराचे मैलामिश्रित सांडपाणी, अनेक साखर कारखान्यांचे दूषित पाणी मुळा, मुठा, इंद्रायणी अन्‌‍ भीमानदीत सोडले जाते. पुढे हे सर्व पाणी ‌‘उजनी‌’त जमा होऊन ते सांडपाण्याचे डबके बनले आहे.

मानवी आरोग्य धोक्यात

‌‘उजनी‌’काठच्या गावागावांत कॅन्सर, मूतखडा व इतरही विकारात प्रचंड वाढ झाल्याचे वैद्यकीय डॉक्टर सांगत आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर थांबला असला तरी शेती नापीक होत आहे. पाळीव जनावरांच्या गर्भधारणेवर परिणाम झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT